मावळच्या ग्रामीण भागाला पर्यटकांची पसंती

Welcome-2020
Welcome-2020

लोणावळा - नाताळच्या सुट्या व नवीन वर्षाच्या मुहूर्तावर पर्यटकांची लोणावळा व खंडाळा परिसरात वर्दळ वाढू लागली आहे. त्यामुळे बाजारपेठ गजबजू लागल्या असून, हॉटेल व रिसॉर्ट चालकांनी पर्यटकांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे.

नववर्षानिमित्त मौजमजा करण्यासह येथील प्रसिद्ध चिक्कीचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. पर्यटकांचे लोणावळा, कार्ला, मळवली, पवनानगर परिसरातील भुशी डॅम, लोणावळा तलाव, तुंगार्ली तलाव, राजमाची, कुणे गाव, रायवूड, लोहगड, एकवीरा-भाजे लेणी परिसर, पवना धरण परिसरातील सेकंड होमसह खासगी बंगल्यांमध्ये वास्तव्य असते. लोणावळ्यात लहान-मोठी मिळून शंभरहून अधिक हॉटेल असून, नववर्षाचा आनंद लुटण्यासाठी ते हाउसफुल्ल होत असतात. यंदा बहुतांश हॉटेलचे बुकिंग शंभर टक्के पूर्ण झालेले नाही. मात्र, नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर पर्यटकांची वर्दळ कायम राहणार असल्याची आशा व्यापाऱ्यांमध्ये आहे.

लोणावळा परिसरासह ग्रामीण भागाकडेही पर्यटकांचा कल वाढत असून, पर्यटकांनी ग्रामीण भागाकडे आपला मोर्चा वळविला आहे. राजमाची व पवना धरण परिसरास पर्यटकांची पसंती वाढली आहे. शुक्रवारपासून (ता. २७) पर्यटकांची वर्दळ वाढल्याने व्यावसायिकांमध्ये चैतन्य पसरले आहे. नवीन वर्षाच्या स्वागताचा आनंद लुटताना पर्यटकांना खबरदारी घ्यावी लागणार आहे. सार्वजनिक ठिकाणी डीजेचा वापर, मद्यपान करीत गोंधळ घालणाऱ्या व वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत लोणावळा पोलिसांनी दिले आहेत. त्यामुळे नियमांचा भंग केल्यास नवीन वर्षाची सुरुवात ही तुरुंगात होऊ शकते. त्यामुळे इतरांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

वाहतूक कोंडी...
ऐन वीकेंडला बोरघाटात द्रुतगती मार्गावर व लोणावळा-खंडाळ्यात जुन्या महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे पर्यटनाची मजा लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांसह वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात दस्तुरी, अमृतांजन पुलाजवळ वाहने बंद पडल्याने कोंडीत भर पडली. पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या पाच ते सहा किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. वाहतुकीचा खोळंबा झाल्याने अवजड वाहनांसह हलकी वाहनेही वाहतूक कोंडीत अडकली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com