अंधारबन जंगलातून पर्यटकांची सुटका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मे 2019

ती काळरात्र भयावह
रात्री अंधारात अडकल्यानंतर या पर्यटकांनी सोबतचे पाणी पूर्णपणे संपले होते. त्यामुळे गगनदीप याला अस्वस्थ वाटू लागले. उलट्या होऊन थकवा आल्याने तो बेशुद्ध झाला. मोबाईलला रेंज नसल्याने त्यांना मदतही मागवता येत नव्हती. सिद्धी हिने पूर्वी काही ट्रेक केले असल्याने ती गगनदीप याच्या सोबत मागे थांबली. ही काळरात्र भयावह असल्याचे त्‍यांनी सांगितले.

माले - मुळशी धरण भागातील दाट अंधारबन जंगलात ट्रेकिंग करताना रात्रीच्या अंधारात अडकलेल्या तीन पर्यटकांची ग्रामस्थ, पोलिस, वनखात्याचे कर्मचारी यांनी सुखरूप सुटका केली. शनिवारी पिंपरी (ता. मुळशी) येथील अंधारबनातील दरीत हा प्रकार घडला.

गगनदीप हरचरण सिंग, प्रांशू प्रदीपसिंह चौधरी (दोघेही रा. बाणेर, पुणे), सिद्धी किरण शहा (रा. हिमकुंज बिल्डिंग, स्वारगेट, पुणे) अशी सुटका केलेल्या पर्यटकांची नावे आहेत. 

गगनदीप, प्रांशु, सिद्धी हे अंधारबनात ट्रेकिंगसाठी आले होते. शनिवारी सकाळी त्यांनी पिंपरी येथून ट्रेकिंगला सुरवात केली. ट्रेकिंग करताना ते पिंपरीच्या दरीत उतरले. दरीत दिवसभर ट्रेकिंग करून पिंपरीकडे परतताना सायंकाळी सातच्या सुमारास ते घोलाच्या ठिकाणी पोचले. घनदाट जंगल व दरीत असल्याने इतर ठिकाणांपेक्षा लवकर अंधार झाला होता. त्यामुळे त्यांना झाडीतून वाटही लक्षात येत नव्हती. 

गगनदीप याला अस्वस्थ वाटू लागल्याने प्रांशू मदत आणण्यासाठी पिंपरी गावच्या दिशेने रस्ता शोधत निघाला. दरीतून वर आल्यावर प्रांशूला रेंज मिळाल्याने त्याने १०० क्रमांकावर पोलिसांना मदत मागितली. 

पिंपरीतील ओळखीच्या लोकांना फोन केला. दरम्यान, पौड पोलिस स्‍टेशनचे निरीक्षक अशोक धुमाळ यांनी उपनिरीक्षक अनिल लवटे, मुजावर, हगवणे यांना रवाना केले. ताम्हिणी अभयारण्याच्या वनपरिक्षेत्र अधिकारी अंकिता तरडे याही त्यांच्या कर्मचाऱ्यांसह निघाल्या. त्यांनी वांद्रेच्या सरपंच दीपाली कोकरे यांना परिस्थिती सांगून स्थानिक लोकांना मदतीसाठी पाठवण्यास सांगितले. 

पिंपरी येथील अनिल खराडे, सुदाम खराडे आदींनी दरीकडे धाव घेतली. रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या मदतीने त्यांनी गगनदीप व सिद्धी यांना दरी, जंगलातून सुखरूप बाहेर काढले.

Web Title: Tourist Release in Andharban Forest