वाढत्या उन्हामुळे जलपर्यटनास पसंती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मे 2019

राज्यभर उकाड्याचे प्रमाण वाढल्याने लोणावळा-खंडाळा परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पर्यटकांची जलपर्यटनास पसंती मिळत आहे.

लोणावळा - राज्यभर उकाड्याचे प्रमाण वाढल्याने लोणावळा-खंडाळा परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पर्यटकांची जलपर्यटनास पसंती मिळत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात सुटी घालविण्यासाठी मावळातील पवना धरण परिसर, कार्ला येथील एमटीडीसी नौकानयन केंद्रासह लोणावळा परिसरातील खासगी जलक्रीडेची ठिकाणे पर्यटकांनी गजबजू लागली आहे. दरम्यान, पर्यटकांनी पाण्याची ठिकाणी सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

लोणावळा, खंडाळा ही ठिकाणे पर्यटकांची आकर्षणाची केंद्रे राहिली आहे. लोणावळा शहरात पर्यटकांचा म्हणावा तसा प्रतिसाद अद्याप मिळाला नसला तरी वीकएण्डला हॉटेल्स व रिसॉर्टस्‌चे बुकिंग साठ ते सत्तर टक्केच्या आसपास झाले आहे. 

कार्ला येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या आरक्षणास अद्याप पर्यटकांचा प्रतिसाद मिळाला नसला तरी पुढील महिनाभरातील शनिवार व रविवार या दिवसांचे बुकिंग फुल्ल झाले आहे. पवना धरण परिसरही पर्यटकांना आकर्षित करीत आहे. येथे सुरू असलेल्या खासगी जलक्रीडेची ठिकाणे शनिवार व रविवार पर्यटकांनी गजबजली होती. 

पर्यटक जलविहारास पसंती देत असल्याने एमटीडीसीतील नौकानयन केंद्र, वॉटरपार्कमध्ये पर्यटकांची गर्दी वाढत असल्याचे निवास व्यवस्थापक महादेव हिरवे यांनी सांगितले.

सावधानता हवी
पाणवठ्याच्या ठिकाणी पर्यटकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. पवना धरण व मुळशी धरणात गेल्या आठवड्यात पाच महाविद्यालयीन तरुण-तरुणींचा बुडून मृत्यू झाला आहे. अतिउत्साहामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत असल्याने पर्यटकांनी निसर्गाचा आनंद लुटताना स्वतःहून खबरदारी घेणे गरजेचे आहे. अपघात टाळण्यासाठी खासगी नौकानयनाची ठिकाणे हॉटेल्स व रिसॉर्टमधील जलतरण तलावाची ठिकाणे जीवरक्षक नेमण्याची गरज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourists are getting preference for water tourism in Lonavla-Khandala area