समाविष्ट ६ गावांत ‘टीपी स्कीम’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

महापालिकेत २० वर्षांपूर्वी समाविष्ट झालेल्या सहा गावांमध्ये नगररचना योजना (टीपी स्कीम) राबविण्याचे नियोजन केले आहे. यात पुनावळे, वाल्हेकरवाडी, रावेत, थेरगाव, चिखली व बोऱ्हाडेवाडी या गावांचा समावेश आहे. येथील एकूण एक हजार १५७ हेक्‍टर क्षेत्रावर ही योजना असेल.

पिंपरी - महापालिकेत २० वर्षांपूर्वी समाविष्ट झालेल्या सहा गावांमध्ये नगररचना योजना (टीपी स्कीम) राबविण्याचे नियोजन केले आहे. यात पुनावळे, वाल्हेकरवाडी, रावेत, थेरगाव, चिखली व बोऱ्हाडेवाडी या गावांचा समावेश आहे. येथील एकूण एक हजार १५७ हेक्‍टर क्षेत्रावर ही योजना असेल.

या माध्यमातून नियोजनबद्ध शहर विकासाच्या अर्थात स्मार्ट सिटीच्या दिशेने महापालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे. शहरात टीपी स्कीम राबविण्याबाबत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने जून महिन्यात ठराव मंजूर केला आहे. त्याबाबतची सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जाहीर केली आहे. संबंधित गावांमधील टीपी स्कीमचा नकाशा नागरिकांच्या माहितीसाठी खुला आहे.

योजना १ 
पुनावळे : अंदाजे क्षेत्र ४४४ हेक्‍टर. उत्तरेस पवना नदीपासून दक्षिणेस मारुंजी गावाच्या शिवेपर्यंत. पूर्वेस पुनावळे विकास योजनेतील सर्वे क्रमांक १० व ताथवडे गावाच्या शिवेपासून पश्‍चिमेस जांबे गावाच्या शिवेपर्यंत. 

योजना २
वाल्हेकरवाडी-रावेत : अंदाजे क्षेत्र १९७ हेक्‍टर. उत्तरेस वाल्हेकरवाडी रस्ता, नवनगर विकास प्राधिकरणाची संपादन हद्द व विकास योजनेतील ४५ मीटर रस्त्यापासून दक्षिणेस पवना नदीपर्यंत. पूर्वेस विकास योजनेतील ३४.५० मीटर रस्त्यापासून पश्‍चिमेस पवना नदीच्या पुलाजवळील औंध- रावेत बीआरटी रस्त्यापर्यंत. 

योजना ३
रावेत : अंदाजे क्षेत्र १२९ हेक्‍टर. उत्तरेस मुंबई-बंगळूर महामार्ग, विकास योजनेतील १८ मीटर रस्ता व औंध- रावेत बीआरटी रस्त्यापासून दक्षिणेस पवना नदीपर्यंत. पूर्वेस विकास योजनेतील १८ मीटर रस्ता व पवना नदीपासून पश्‍चिमेस किवळे गावाच्या शिवेपर्यंत.

योजना ४
चिखली : अंदाजे क्षेत्र १२६ हेक्‍टर. उत्तरेस देहू- आळंदी रस्त्यापासून दक्षिणेस विकास योजनेतील १८ मीटर रस्त्यापर्यंत. पूर्वेस चिखली- मोशी शिवेवरील विकास योजनेतील २४ मीटर रस्त्यापासून पश्‍चिमेस विकास योजनेतील ३० मीटर रस्त्यापर्यंत. 

योजना ५
बोऱ्हाडेवाडी : अंदाजे क्षेत्र २२३ हेक्‍टर. उत्तरेस देहू- आळंदी रस्त्यापासून दक्षिणेस जुना गट क्रमांक ११९९ ते ११४० मधील महापालिकेच्या विकास योजनेतील (पूर्वीचे प्राधिकरण क्षेत्र) शेती क्षेत्रापर्यंत. पूर्वेस जुना गट क्रमांक १४०८ मधील नाला, पुणे- नाशिक महामार्गापासून पश्‍चिमेस चिखली गावाच्या शिवेपर्यंत. 

योजना ६
थेरगाव : अंदाजे क्षेत्र ३८ हेक्‍टर. उत्तरेस विकास योजनेतील १८ मीटर रस्त्यापासून दक्षिणेस थेरगाव गावठाणापर्यंत. पूर्वेस पवना नदीपासून पश्‍चिमेस सर्वे क्रमांक २६, २८ पर्यंत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TP Scheme in Pimpri Chinchwad Involve 6 villages