तांदळाच्या कलात्मक पिंडींची दोनशे वर्षांची जुन्नर, खेडला परंपरा 

दत्ता म्हसकर
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

खेड व जुन्नर तालुक्यातील काही शिवालयांत श्रावण महिन्यातील दर सोमवारी परंपरेने तांदळाच्या कलात्मक पिंडी केल्या जातात. या पिंडी बनविण्याची परंपरा सुमारे दोनशे वर्षांहून जुनी असल्याचे सांगण्यात येते.

जुन्नर (पुणे) : खेड व जुन्नर तालुक्‍यातील काही शिवालयांत श्रावण महिन्यातील दर सोमवारी परंपरेने तांदळाच्या कलात्मक पिंडी केल्या जातात. या पिंडी बनविण्याची परंपरा सुमारे दोनशे वर्षांहून जुनी असल्याचे सांगण्यात येते. गुरव समाजाने ही परंपरा जतन करण्याचे काम केले आहे. 

जुन्नरजवळील किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेले पंचलिंग शिवालय, ओतूरचे कपर्दिकेश्वर शिवालय, पिंपळवंडीचे ग्रामदैवत पिंपळेश्वर शिवालय व खेड तालुक्‍यातील दोंदे येथील भीमा नदी काठचे दक्षिणेश्वर शिवमंदिरात सुमारे दोनशे वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. या पिंडी बनविण्यासाठी लागणारा तांदूळ हा देखील परंपरेने दिला जातो. परिसरातील ग्रामस्थ देखील तांदूळ देत असतात. 

शिवनेरीचे पंचलिंग मंदिर 
पंचलिंग मंदिरात महादेवाच्या प्रतीकात्मक मुखवट्याच्या मस्तकावरील शिरेतून एक लिंबाच्या आधारावर तांदळाच्या पिंडी बनवून ठेवल्या जातात. मंदिरावर तीन टप्प्यांत लहान मोठे एकशे एक कळस आहेत. त्यावर ब्रह्मा, विष्णू, महेश या दैवतांची विविध रूपे आहेत. पुष्करणीत बाराही महिने गोमुखातून पाण्याची धार सुरू असते. पंचलिंग देवस्थानची माजी नगराध्यक्ष (कै) रावसाहेब ऊर्फ रावजी अनाजी बुट्टे पाटील ट्रस्ट काम करत असून, बेलाची पाने, सुवर्ण बेलपत्र, पिंडीसाठी लागणारा तांदूळ बुट्टे पाटील कुटुंब पिढ्यान्‌ पिढ्या दिला जात आहे. येथे दर सोमवारी यात्रा भरते. शेवटच्या सोमवारी कुस्त्यांचा आखाडा भरतो. 

ओतूरचा कपर्दिकेश्वर 
कपर्दिकेश्वर मंदिरात ट्रस्टमार्फत पिंडी केल्या जातात. मंदिरात वाहण्यात आलेले पैसे दानपेटीत जमा केले जातात; तर जमा झालेल्या तांदळाचा लिलाव केला जातो. येथे तिसऱ्या व चौथ्या सोमवारी मोठी यात्रा भरते. तसेच, कुस्त्यांचा आखाडा भरतो. 

पिंपळवंडीचा पिंपळेश्वर 
पिंपळवंडी येथील पिंपळेश्वर ओढ्याच्या काठी हेमाडपंती पिंपळेश्वर शिवालय आहे. येथील पिंपळाच्या झाडाखाली पिंपलाद ऋषींनी तपश्‍चर्या केली असल्याचे सांगण्यात येते. येथे हिराबाई शिंदे या ज्येष्ठ महिला पुजारी असून, त्या तांदळाच्या पिंडी करतात. येथील गंगाकुंडात वर्षभर गायमुखातुन पाणी वाहत असते. या कुंडातील पाणी गंगातीर्थ व छोट्या कुंडातील काशीतीर्थ म्हणून ओळखले जाते. मंदिराच्या शेजारीच पिंपलाद ऋषींची समाधी आहे. मंदिर गर्भगृहात डावीकडे पिंपलाद ऋषींची शिरविरहीत मूर्ती आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tradition of making Pindi from rice in Junnar, Khed