वाहतूक शाखेची कोटीच्या कोटी उड्डाणे 

वाहतूक शाखेची कोटीच्या कोटी उड्डाणे 

पुणे - स्टॉपलाइन ओलांडून झेब्रा क्रॉसिंगवर तुमचे वाहन उभे असेल, तुम्ही सिग्नल तोडून सुसाट वेगाने जात असाल... अशा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करताना सीसीटीव्ही तुम्हाला "कॅच' करेल आणि थेट दंडाच्या पावतीचा मेसेज मिळत आहे. अशा पद्धतीने गेल्या वर्षभरात एकवीस कोटी रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे. मात्र, अजूनही तेवढीच रक्कम वसूल करायची बाकी आहे. 

पोलिसांच्या वाहतूक शाखेने 29 मार्च 2017 पासून सीसीटीव्हीवरून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना शोधून काढत त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरवात केली. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांतच म्हणजेच 24 मे 2017 पासून नियम मोडणाऱ्यांसाठी जागेवरच दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी स्वाइप मशिन्सचा (डिव्हाइस) वापर सुरू झाला. सीसीटीव्ही व स्वाइप मशिनचा वापर सुरू केल्याच्या सुविधांमुळे वाहतूक पोलिसांची कारवाई "कॅशलेस' होण्यास सुरवात झाली. वाहतूक शाखेच्या या "ई-चलन' व्यवस्थेच्या वर्षपूर्तीनंतर वाहतूक शाखा "मालामाल' होऊ लागल्याचे चित्र समोर आले आहे. विशेषतः या सुविधेमुळे वाहतूक पोलिसांच्या "खाबुगिरी'लाही काही प्रमाणात आळा बसल्याची सद्यःस्थिती आहे. 

मुख्य रस्ता असो किंवा मध्यवर्ती भागातील कोणतेही गल्लीबोळ. हातात पावत्यांची पुस्तके हातात घेऊन वाहतूक पोलिस दिसेल, नियम मोडणाऱ्याला बाजूला घेऊन पावत्या फाडण्याचा प्रकार सुरू होता. बहुतांश वेळा पावती न फाडता जागेवरच "तोडपाणी' करून अनेक जण निघून जात होते. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करणारे, पोलिसांनी पकडले, की त्यांच्या हातात एखादी नोट ठेवून पुढे निघून जायचे, हे चित्र काही प्रमाणात बदलणे "ई-चलन'मुळे शक्‍य होऊ लागले आहे. 

पोलिसांकडून 2016 पर्यंत पारंपरिक पद्धतीने पावत्या फाडून दंडवसुली केली जात होती. 2016 मध्ये पावत्यांद्वारे 11 लाख 89 हजार 49 दंडाची प्रकरणे झाली, तर त्यांच्याकडून 19 कोटी 96 लाख 44 हजार 220 इतका दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, स्वाइप मशिन व सीसीटीव्हीमुळे दंडवसुलीला चांगलाच हातभार लागल्याची स्थिती आहे. अकरा महिन्यांतच स्वाइप मशिनद्वारे 18 कोटी 47 लाख 73 हजार 895 रुपयांची दंड वसुली झाली आहे. आणखी 11 कोटी रुपयांची वसुली होणे बाकी आहे, तर सीसीटीव्हीद्वारे झालेल्या कारवाईतून सव्वादोन कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल झाला आहे. मात्र, आणखी साडेदहा कोटी रुपयांचा दंड अद्याप वसूल झालेला नाही. त्यामुळे सीसीटीव्ही व स्वाइप मशिन या दोन्हींची एकूण 20 कोटी 44 लाख 49 हजार 727 रुपयांहून अधिक रक्कम येणे बाकी आहे. 

..तरीही "तोडपाणी' सुरूच आहे ! 
वाहतूक शाखेने वाहतूक पोलिसांमधील भ्रष्टाचारास आळा बसावा, यासाठी ई-चलन सुविधा सुरू केली. त्यामुळे पोलिसांना थेट पैसे खिशात घालणे शक्‍य होत नाही. तरीही काही रस्ते व चौकांमधील पोलिस वाहने बाजूला घेऊन "सावज' टिपण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र अद्यापही घडत असल्याची सद्यःस्थिती आहे. 

29/3/2017 ते 31/3/2018 पर्यंतची ई-चलनाची सद्यःस्थिती 
सीसीटीव्हीद्वारे झालेली कारवाई 
एकूण प्रकरणे दंडाची प्रकरणे दंड प्रलंबित प्रकरणे दंड भरलेली रक्कम दंड न भरलेली रक्कम दंडाची एकूण रक्कम 
5,30,218 - 101026 - 4,29,192 - 2,27,05,700 - 10,35,39, 400 - 12,62,45, 100 

स्वाइप मशिनद्वारे (डिव्हाइस) झालेली कारवाई 
एकूण प्रकरणे दंडाची प्रकरणे दंड प्रलंबित प्रकरणे दंड भरलेली रक्कम दंड न भरलेली रक्कम दंडाची एकूण रक्कम 
11,14,641 - 8, 02, 445 - 3, 12,096 - 18, 47,73,895 - 10,09, 10,327 - 28, 56,84, 222 

सीसीटीव्ही/स्वाइप मशिनची एकूण कारवाई 
एकूण प्रकरणे दंडाची प्रकरणे दंड प्रलंबित प्रकरणे दंड भरलेली रक्कम दंड न भरलेली रक्कम दंडाची एकूण रक्कम 
16,44, 859 - 9,03, 571 - 7, 41, 288 - 20, 74,79, 595 20,44,49,727 41, 19, 29, 322 

* सीसीटीव्हीवरून नियम मोडणाऱ्यांना पाठविलेले मेसेज - 1,92,050 
* सध्या उपलब्ध असलेल्या स्वाइप मशिनची संख्या - 425 
* पावत्यांच्या तुलनेत दंडवसुलीचे प्रमाण दुप्पट 


ई-चलनमुळे झालेले महत्त्वपूर्ण बदल 
* वाहनचालकांकडून नियमांचे पालन होऊ लागले 
* दंडाची रक्कम स्वीकारण्याचा व्यवहार कॅशलेस व पेपरलेस 
* वाहनचालक व पोलिसांमधील वाद-विवाद कमी झाले 
* नियम मोडणाऱ्या पीएमपीएल बसवरही कारवाईचा बडगा 
* नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद 

असा ठोठावला जातो दंड 
संपूर्ण शहरातील रस्त्यांवरील सिग्नलवर असलेल्या सीसीटीव्हीद्वारे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची वाहतूक शाखेच्या पोलिस नियंत्रण कक्षात बारकाईने पाहणी केली जाते. नियम मोडणाऱ्यांच्या वाहनांवरील क्रमांकावरून प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) नोंदणी केलेल्या मोबाईलवरून त्यांना नियम मोडल्याचा अधिकृत मेसेज पाठविला जातो. त्यानंतर दंडाची रक्कम कोणत्याही ई-वॉलेट, एटीएम कार्ड, डेबिट कार्डद्वारे पोलिसांकडे भरता येते. ई-वॉलेट वापरता येत नाही, त्यांच्यासाठी व्होडाफोनच्या शोरूममध्ये दंडाची रक्कम भरता येते. 

""ई-चलन व्यवस्थेमुळे वाहतूक पोलिसांच्या कार्यामध्ये पारदर्शकता आली. सीसीटीव्हीद्वारे प्रत्येक वाहनचालकांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असल्यामुळे वाहनचालकांमध्ये स्वयंशिस्त निर्माण होऊ लागली आहे. दंडवसुली करण्याचे प्रमाण निम्म्याहून अधिक असले, तरी ते प्रमाण दोन महिन्यांमध्ये कमी होईल. नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे. तसे झाल्यास दंडात्मक कारवाईचे प्रमाणही कमी होईल.'' 
- अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त, वाहतूक पोलिस विभाग. 

पूर्वी पावती फाडण्यावरून पोलिस व वाहनचालकांमध्ये वाद होत असे. आता तो प्रश्‍न येत नाही आणि पोलिसांनाही "तोडपाणी' करता येत नाही. व्यवहार पारदर्शक झाला, तसेच आपण नियम मोडल्यास सीसीटीव्हीमध्ये दिसू आणि आपल्याला दंड भरावा लागेल, ही भीती वाहनचालकांमध्ये आहे. त्यामुळे नियम पाळण्यास प्राधान्य देऊ लागले आहेत. 
विक्रांत भोसले, वाहनचालक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com