पुण्याच्या खेडमधील दळवळण ठप्प 

महेंद्र शिंदे
शनिवार, 27 जुलै 2019

खेड तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कडूस- कारामळी येथील कुमंडला नदीवरील पुल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यातील दळणवळण ठप्प झाले आहे.  

कडूस (पुणे) : परिसरात दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कडूस- कारामळी (ता. खेड) येथील कुमंडला नदीवरील पुल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यातील दळणवळण ठप्प झाले आहे.  

खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यात सलग दोन दिवस पावसाची संततधार सुरू आहे. परिसरातील नदी- नाले दुथडी वाहत आहेत. कुंडेश्वर डोंगराकडून वाहणारी कुमंडला नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी कडूस- गारगोटवाडीच्या कारामळी येथील पुलावरून वाहत आहे. त्यामुळे कडूस- वाशेरे- कुडे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या मार्गावरून कोहिंडे, वाशेरे, कुडे, औदर, वाजवणे आदी पश्‍चिम पट्ट्यातील गावांशी दळणवळण सुरू असते. परंतु, पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने या गावांशी संपर्क तुटला आहे. मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे. 

कडूस ते गारगोटवाडीदरम्यान कारामळी येथे कुमंडला नदीवर वीस वर्षांपूर्वी बांधलेला हा साकव पूल उंचीने अतिशय लहान आहे. पावसाळ्यात दरवर्षी पुलावरून पाणी वाहत असते. तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यातील दळणवळण बंद पडते. या ठिकाणी उंचीने मोठा पुल बांधावा, अशी मागणी गारगोटवाडीचे माजी सरपंच जितेंद्र काळोखे, सुखदेव गारगोटे, किसनराव गारगोटे, अशोक गारगोटे यांनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic disturb due to heavy rain in khed