
Pune News : बाजार समितीचा कारभार वाऱ्यावर; दोन उपनिबंधक दर्जाचे अधिकारी तरीही प्रश्न तसेच
पुणे : फळ-भाजीपाला बाजार सकाळच्यावेळी प्रचंड वाहतूक कोंडी होते. भुसार बाजार अनेक ठिकाणी कचरा पडलेला असतो. कोट्यावधींचा खर्च करून काही शौचालये बंद आहेत. बाजारात शेतमालाच्या चोऱ्या देखील वाढल्या आहेत.
त्यामुळे बाजार समितीत सचिव आणि प्रशासक असे दोन उपनिबंधक दर्जाचे अधिकारी असताना देखील समितीचा कारभार वाऱ्यावर असल्याची भावना व्यापाऱ्यांमध्ये आहे. बाजारात पहाटेच्या वेळी शेतमालाच्या गाड्या येतात. याचवेळी खरेदीदार देखील आलेले असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते.
परंतु कोंडी सोडविण्यासाठी कोण अधिकारिदेखी उपस्थीत नसतात. तर बाजारातील सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून सुरक्षा रक्षक जागेवर नसतात. कोट्यावधींचा खर्च करून शौचालये उभारली आहेत. परंतु यातील काही बंद आहेत. भुसार बाजार अनेक ठिकाणी दिवस कचरा पडलेला असतो. यामुळे दुर्गंधी पसरते. परंतु याकडे लक्ष दिले जात नाही.
बाजारातील सुरक्षा व्यवस्था आणि शेतमाल चोऱ्या बाबत बाजार समितीच्या व्हॉट्स ॲप ग्रुपवर तक्रार केल्यानंतर प्रशासन म्हणते पोलिसांकडे तक्रार करा. मग वर्षाला कोट्यवधी रुपये खर्च करून नेमलेली सुरक्षा व्यवस्था काय कामाची असा प्रश्न पडतो. त्यामुळे बाजार घटकांनी जायचे तरी कोणाकडे असा सवाल बाजारातील व्यापारी करत आहेत. याबाबत बाजार समितीचे सचिव मधुकांत गरड यांना फोन केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
प्रशासक म्हणतात दोन महिन्यांसाठीच
राज्य शासनाने हौसारे यांच्याकडे बाजार समितीचा अतिरीक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. नवनियुक्त प्रशासक हौसारे यांनी बाजार समीतीच्या प्रशासक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विभाग प्रमुख, अधिकारी यांची बैठक घेतली.
त्या बैठकीत मी केवळ दोन महिन्यांसाठी असल्याचे हौसरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अधिकारी कर्मचारी यांची द्विधा मनस्तिस्थी झाल्याचे कामावरून दिसून येते. तर हौसारे देखील पूर्वीचा कार्यभार सांभाळत बाजार समितीत थोडा वेळच येऊन जातात. त्यामुळे त्यांचेही फार लक्ष नसल्याचे दिसून येते.
बाजारात सातत्याने शेतमालाच्या चोऱ्या होत आहेत. त्यावर अद्याप बाजार समितीला नियंत्रण मिळवता आलेले नाही. तसेच बाजारात वाहतूक कोंडी होते. याबाबत तक्रारी करून देखील बाजार समितीने अद्यापही कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. बाजार समितीचा ढिसाळ आणि नियोजन शून्य कारभार यामुळे समोर येत आहे.
- महेश शिर्के, उपाध्यक्ष, अडते असोसिएशन
कचरा उचलण्यासाठी घंटा गाडी सुरू करण्याची गरज आहे. बाजारात दिवसभर खरेदीदार, कामगार, व्यापारी वावरत असतात. कचरा सकाळच्या वेळेत लवकर उचलला गेला तर बाजार घटकांना त्रास यांना होणार नाही. बाजारात फिरणारी डुकरे, जनावरे यांना प्रतिबंध घालणे गरजेचे आहे.
- राजेंद्र बाठीया, अध्यक्ष, दि पूना मर्चंटस् चेंबर
पहाटेच्या वेळेत बाजारात वाहतूक कोंडी होते. यामुळे शेतमालाचा उठाव होत नाही. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- रोहन जाधव, संचालक, अडते असोसिएशन