बावधनकर फोडणार वाहतूक काेंडी

PNE19P81355.jpeg
PNE19P81355.jpeg

पुणे : दररोज सकाळ-संध्याकाळ होणारी भीषण वाहतूक कोंडी ही बावधनकरांची रोजची डोकेदुखी आहे. विशेषतः संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेत बावधनमध्ये येणारे आणि बाहेर जाणारे सर्व रस्ते वाहनांनी ओसंडून जातात. त्यामुळे ही जीवघेणी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी स्थानिकांनीच पुढाकार घेतला आहे. दररोज सायंकाळी 
20 ते 25 स्वयंसेवक बावधनच्या चौकाचौकात वाहतूक नियंत्रणाचे काम करत आहेत. 

उपनगरांमध्ये बावधनचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात रहदारी असते. संध्याकाळी मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असते. सर्व रस्ते आणि गल्ल्यांमध्ये उभी केलेली वाहने मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत असतात. कोणीही कुठेही, कुठूनही घुसून ही समस्या भीषण होत जाते. त्यात मुख्य पाषाण रस्त्यावर अनेक ठिकाणी लोकांनी केलेली बेशिस्त पार्किंग, दुहेरी-तिहेरी पार्किंगने या सगळ्या गोंधळात भर पडते. त्यामुळे बावधनमधील प्रसाद शिरगावकर, दुष्यंत भाटिया, दीपा प्रभू, आशिष सराफ, सी. एस. कृष्णन, बीना मेनन, सुजाता गोखले, पल्लवी सजनपवार, प्रसाद शिरगावकर, टी. बी. जाधव, सलिल मेहेंदळे आदींनी पुढाकार घेऊन सहा महिन्यांपूर्वी बावधन सिटिझन फोरमची स्थापना केली.

स्वतःहून पुढे आलेले 20-25 स्वयंसेवक रोज संध्याकाळी 6 वाजता बावधनमधल्या काही महत्त्वाच्या चौकांमध्ये जमतात. विशेष म्हणजे या स्वयंसेवकांमध्ये बारा-चौदा वर्षांच्या मुलांपासून ते सत्तरीतल्या युवकांपर्यंतचा समावेश आहे. काही जण वाहतुकीचे नियमन करतात, तर काही जण बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांना समजावून सांगून पार्किंगला शिस्त लावायचा प्रयत्न करतात. त्यामुळे रोज काही काळासाठी का होईना; पण वाहतूक सुरळीत होताना आणि पार्किंगला शिस्त लागताना दिसत आहे. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन शिरगावकर यांनी केली आहे. 

शिरगावकर म्हणाले, रोजचे संध्याकाळचे तीनेक तास संपूर्ण बावधन वाहतूक कोंडीमुळे वेठीला धरले जाऊन बावधनकरांचा श्वास कोंडला जातो. बावधन हे हिंजवडी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येते. हिंजवडी वाहतूक पोलिसांकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. जे आहे त्यातून हिंजवडीपासून पाषाणपर्यंतच्या वाहतुकीचे नियमन करताना दमछाक होत असते. त्यामुळे बावधनसाठी ट्रॅफिक पोलिस पुरवणे पोलिसांना शक्‍य होत नाही. त्यामुळे या समस्येतून मार्ग काढण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आमच्या कार्यात सहभागी होण्यासाठी लोकांना व्हॉट्‌सऍप व फेसबुकच्या माध्यमातून आवाहन करत आहोत. गेले दोन आठवडे हा प्रयोग सुरू आहे. हे प्रचंड मेहनतीचे काम आहे; पण या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com