#TrafficIssue बेकायदा वाहतुकीमुळे धोका

वाकडेवाडी - रात्रीच्यावेळी भर रस्त्यातच प्रवासी घेण्यासाठी खासगी बस थांबविल्या जातात. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनांचा अपघात होऊ शकतो; त्याचप्रमाणे वाहतूक कोंडीही होते.
वाकडेवाडी - रात्रीच्यावेळी भर रस्त्यातच प्रवासी घेण्यासाठी खासगी बस थांबविल्या जातात. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनांचा अपघात होऊ शकतो; त्याचप्रमाणे वाहतूक कोंडीही होते.

खासगी बसच्या ‘पिकअप पॉइंट’मुळे रात्री वाहतूक कोंडी अन्‌ अपघात
पुणे - शनिवारी रात्री आठ वाजताची वेळ... कात्रजच्या मुख्य चौकात सहा आसनी रिक्षामध्ये १०-१२ जण कोंबून बसविलेले...  एकीकडे इतक्‍या प्रवाशांना घेऊन निघालेली रिक्षा... तर दुसरीकडे भर चौकातच ‘पिकअप पॉइंट’वर थांबलेल्या खासगी ट्रॅव्हल्समध्ये प्रवासी चढ-उतार करताना झालेली वाहतूक कोंडी... अशा पद्धतीने शहराच्या वेगवेगळ्या भागांत बेकायदा खासगी प्रवासी वाहतुकीमुळे प्रवाशांचा जीव धोक्‍यात येत असून, दुसरीकडे गर्दीच्या ठिकाणी थांबणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्समुळे अन्य वाहनचालकांना आपला जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. मात्र, असे प्रकार थांबविण्यासाठी वाहतूक पोलिस ठोस कारवाई करताना दिसत नसल्याचे चित्र आहे.

येथून होते बेकायदा वाहतूक 
कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावरील हिंजवडी, बावधन, चांदणी चौक, वडगाव, कात्रज, कोंढवा, येवलेवाडी, हडपसर, पुणे स्टेशन, शिवाजीनगर, स्वारगेट, महापालिका भवन या मध्यवर्ती भागांसह वारजे, मंतरवाडी, नगर रस्ता, येरवडा, मार्केट यार्ड-मरिआई माता मंदिर परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात बेकायदा प्रवासी वाहतूक होते. सहा आसनी रिक्षामध्ये (सिक्‍स सीटर) क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी बसविण्यात येतात. याबरोबरच खासगी जीप, ओमिनी, छोट्या बस, खासगी कारमधूनही सर्रासपणे प्रवासी वाहतूक केली जाते. रात्री आठ वाजल्यापासून या वाहतुकीचे प्रमाण वाढते. त्यामुळेच उपनगरांमध्ये वाहतुकीची कोंडी होते. 

पिकअप पॉइंटजवळ कोंडी
पुणे स्टेशन, रुबी हॉल क्‍लिनिक परिसर, शिवाजीनगर आकाशवाणी, स्वारगेट, कात्रजचा मुख्य चौक, लक्ष्मीनारायण चित्रपटगृह, पद्मावती, हडपसरमधील रविदर्शन सोसायटी ते मगरपट्टा पूल, खडकीतील पाटील इस्टेट झोपडपट्टी, अंडी उबवणी केंद्र, येरवडा येथील गुंजन चौक, शास्त्रीनगर चौक, पर्णकुटी चौक ही ठिकाणे ट्रॅव्हल्सची ‘पिकअप पॉइंट’ आहेत. अनेकदा स्वारगेट एसटी स्थानकासमोरील उड्डाण पुलावरच बेकायदा ट्रॅव्हल्स थांबवून प्रवासी भरले जातात. त्याचपद्धतीने शिवाजीनगर येथील आकाशवाणीशेजारी थांबणाऱ्या ट्रॅव्हल्समुळे वाहतूककोंडीत भर पडते. याचा जाब विचारणाऱ्यांना ट्रॅव्हल्सचे एजंट, चालक, क्‍लिनरकडून शिवीगाळ, धमकाविणे, मारहाण करणे यांसारखे प्रकार केले जातात. ट्रॅव्हल्स चौकांमधून वळताना अनेकदा अपघात होतात. अनेकदा रांगेत किंवा शेजारी-शेजारी थांबणाऱ्या ट्रॅव्हल्समुळे अन्य वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन मार्ग काढावा लागतो. 

वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
खासगी प्रवासी वाहतूक किंवा ट्रॅव्हल्सच्या बेकायदा पिकअप पॉइंटमुळे होणाऱ्या कोंडीचा वाहनचालकांना त्रास होतो. मात्र, अनेकदा पोलिस तात्पुरती कारवाई करून त्यांना मोकळी वाट करून देतात. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांचा वचकच राहत नाही. त्यातही काही धाडसी वाहतूक पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कारवाई केल्यास वरिष्ठांकडून फोन आल्यानंतर नाइलाजास्तव त्यांना सोडावे लागते. अनेक चालक मद्य प्राशन करून वाहन चालविताना आढळतात. त्यामुळे छोटे-मोठे अपघात होतात. त्यांच्यावरही कारवाईची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com