#TrafficIssue पुणेकरांची होणार कोंडीतून सुटका

Traffic-Issue
Traffic-Issue

पुणे - शहरातील वाहतूक कोंडीची मूळ कारणे शोधून त्यावर आधारित उपाययोजनांचा आराखडा वाहतूक पोलिसांनी तयार केला आहे. त्याची व्यवस्थित अंमलबजावणी झाल्यास पुणेकरांची कोंडीतून सुटका होऊ शकते.

शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे शहरांतर्गत सरासरी वाहतुकीचा वेग सुमारे २० किलोमीटर प्रतितासापेक्षा कमी झाला आहे. 

परिणामी, कोथरूडवरून कल्याणीनगरपर्यंत जाण्यासाठी अनेकदा तास ते दीड तास लागतो. यामध्ये नोकरवर्गाचे मोठे हाल होत आहेत.

वाहतूक पोलिसांनी शहरातील सद्यःस्थिती जाणून घेण्यासाठी ‘ट्रॅफिक मॅनेजमेंट प्लॅन’ तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. वाहतूक पोलिसांच्या २२ विभागांना त्यांच्या विभागातील वाहतूक कोंडीची कारणे आणि त्यावरील उपाययोजनांसाठी माहिती संकलनाचे काम सुरू केले आहे. त्याप्रमाणे हडपसर, नगर रस्ता, डेक्कन भागातील काही रस्त्यांवरील दुभाजकांमध्ये बदल केल्याने या भागातील वाहतूक अंशतः सुरळीत झाली आहे. केवळ कारवाईने वाहतूक सुधारणा होणार नाहीत, त्यासाठी इतर कामेही करावी लागतील, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले. 

पोलिसांनी लक्ष द्यावे
एकाच चौकात घोळका करून वाहनचालकांवर कारवाई करण्यापेक्षा पोलिसांचे हे मनुष्यबळ इतर लहान चौकांमध्ये वापरावेत, त्यामुळे शहरातील ५० ते ६० टक्के वाहतूक आपोआप सुधारेल. पोलिसांना रोज वेगवेगळी ठिकाणे दिली पाहिजेत. अवैध रिक्षा, बस वाहतूक याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे मेरे अपने संस्थेचे बाळासाहेब रुणवाल यांनी सांगितले.

पादचारी मार्गांवरील अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागते. पार्किंगसाठी अपुरी जागा आणि धोरण नसल्याने रस्त्यावर गाड्या लावल्या जातात. विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, पायाभूत सुविधा व नियोजनाचा अभाव आणि वाहनांची वाढलेली संख्या ही वाहतूक कोंडीची प्रमुख कारणे आहेत. त्यातून महापालिकेच्या मदतीने मार्ग काढला जाईल. 
- पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com