#TrafficIssue ‘सेफ बावधन, सेव्ह बावधन’चा नारा

Traffic-Issue
Traffic-Issue

बावधन - चांदणी चौकातून पाषाण सुतारवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नित्यनियमाने होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी, तसेच चालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी बावधन सिटिझम फोरमचे कार्यकर्ते रस्त्यावर एकवटले. वाहतूक नियमाचे फलक दर्शविणारे फलक घेऊन दोन किलोमीटरची रॅली काढण्यात आली. ‘सेफ बावधन, सेव्ह बावधन’चा नारा देत या रॅलीत सुमारे दीडशे नागरिक सहभागी झाले होते.

रॅलीचे नियोजन दुष्यंत भाटिया, दीपा प्रभू, पल्लवी सजनपवार, सी. एस. कृष्णन यांनी केले होते.

चांदणी चौकातून वैष्णवी हॉटेलसमोर अस्ताव्यस्तपणे पार्किंग केलेल्या गाडीचालकांना व्यवस्थित गाड्या लावण्याचे आवाहन करण्यात आले. मासेमारी चौकात एकत्र आल्यानंतर भाटिया, प्रभू यांनी वाहतूक नियमांची उपस्थितांना माहिती दिली. चांदणी चौकातून बावधन खुर्दपर्यंत उताराचा मार्ग आहे. त्यामुळे गाड्या वेगात खाली येतात. सततच्या गाड्यांमुळे लहान मुले, ज्येष्ठांना रस्ता पार करणे कठीण जाते. त्यामुळे आपणच वाहतूक नियम पाळल्यास वाहतूक कोंडी होणार नाही, असे प्रभू यांनी सांगितले. या वेळी बावधन पोलिसही कार्यरत होते. रॅलीत नागरिकांसमवेत नगरसेवक दिलीप वेडे पाटील, किरण दगडे, अल्पना वरपे, डॉ. श्रद्धा प्रभुणे हेदेखील सहभागी झाले होते.  अंधार झाल्याने मोबाईल बॅटऱ्या सुरू करून नागरिकांनी मार्चही काढला. पल्लवी सजनपवार यांनी सर्वांना वाहतुकीचे नियम पाळण्याची शपथ दिली.

नागरिकांच्या प्रतिक्रिया
सी. एस. कृष्णन (निवृत्त प्लॅस्टिक इंजिनिअर) - रस्त्याने गाडी चालविताना नागरिक शिस्त पाळत नाही. काही ठिकाणी पदपथही गायब झालेले आहे. मानवनिर्मित वाहतूक कोंडी होत असते.

अरुण कोतवुळकर - रस्त्याच्या कडेला असलेल्या हातगाड्या काढल्या पाहिजेत. काही ठिकाणी एकापुढे एक अशा दोन दोन गाड्या पार्क केल्या जातात. खाद्यपदार्थ खाण्यासाठी येणारे नागरिक रस्त्याच्याकडेला गाड्या कशाही उभ्या करतात. 

पल्लवी सजनपवार - गेल्या दोन महिन्यांपासून फोरमच्या माध्यमातून आम्ही दररोज या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी धडपडत आहोत. गाड्यांच्या वेगाने लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना रस्ता पार करणे कठीण होते.

गार्गी क्षीरसागर (सेवानिवृत्त शिक्षिका) - या रस्त्यावर मुख्य चौकात सिग्नल बसविण्याची आवश्‍यकता आहे. त्याचप्रमाणे चांदणी चौक ते रानवारापर्यंत वाहतूक पोलिसाचीही गरज आहे. कारण बेकायदेशीरपणे वाहन चालविणाऱ्यांना पोलिसांचीच भाषा समजत असते.

मनीष देव (नोकरदार) - माणूसच स्वतःच्या सोयीप्रमाणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करतो. प्रत्येकाने स्वतःमध्ये वाहतुकीचे नियम पाळल्यास कोंडी कुठेही होणार नाही. गाडी चालविताना जसा स्वतःचा विचार करतो, तसाच दुसऱ्याच्याही मनाचा विचार करावा.

केदार बापट (आयटी इंजिनिअर) - गेल्या तीन आठवड्यांपासून बावधन सिटिझन फोरमच्या माध्यमातून रस्त्याचा आम्ही सर्व्हे केला. त्याचा मास्टर प्लॅनही तयार केला असून, नगरसेवक, महापालिका आणि वाहतूक विभागाच्या समन्वयाने राबविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. 

उदय दाणी (उपाध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ) - रस्त्याने प्रत्येक जण आपल्याच मर्जीने गाड्या चालवितात. वास्तविक प्रत्येकाने शिस्त पाळली पाहिजे. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक पोलिसांची नितांत गरज आहे.
शैलेंद्र पटेल (जलदूत) ः प्रत्येकाने गाडी चालविताना लेनची शिस्त पाळली पाहिजे. जोपर्यंत आपण लेनची शिस्त पाळत नाही, तोपर्यंत वाहतूक कोंडीची समस्या सुटणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com