वाहतूक चौकीने कोंडी सुटणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 जानेवारी 2019

रावेत - तळवडे गावात होणाऱ्या वाहतूक शाखेच्या चौकीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे तळवडे येथील वाहतूक समस्या सुटण्यास मदत होणार आहे. 

रावेत - तळवडे गावात होणाऱ्या वाहतूक शाखेच्या चौकीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे तळवडे येथील वाहतूक समस्या सुटण्यास मदत होणार आहे. 

तळवडेतील निगडी तळवडे मार्गावर, गावठाण चौक आणि देहू आळंदी वारी मार्गावर असलेल्या सॉफ्टवेअर चौकात सतत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. ही समस्या सोडवावी, अशी सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी, स्थानिक, सॉफ्टवेअर कंपन्यांची मागणी होती. या वाहतूक कोंडीचे वृत्त सकाळनेही वारंवार प्रसिद्ध केले होते. याची दखल घेऊन तळवडे वाहतूक चौकीचे काम हाती घेण्यात आले होते. ते आता अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे हे वाहतूक समस्या सुटण्यास मदत होईल. 

पिंपरी-चिंचवड शहरात स्वतंत्र पोलिस आयुक्तालय झाल्याने, तसेच पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी पुढाकार घेऊन शहरातील वाहतूक सुरळीत करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्या अनुषंगाने त्यांनी दिघी, आळंदी, देहूरोड व तळवडे या ठिकाणी नव्याने वाहतूक चौकी उभारण्याची योजना आखली आहे. त्यानुसार देहू, तळवडे, चिखली या गावातील विविध चौकातील वाहतूक नियंत्रण तळवडे येथील वाहतूक शाखेच्या वतीने केले जाणार आहे. अत्यंत कमी कालावधीत चौकी उभारण्यासाठी पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिलीप भोसले हे काम पाहत आहेत.

इंद्रायणी नदीवर झालेल्या पुलामुळे तळवडे परिसरातून वाहनांची वर्दळ वाढत आहे. दिवसेंदिवस बेशिस्त व नियमबाह्य वाहतुकीत वाढ होत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नवीन वाहतूक शाखेचा फायदा होईल. 
- प्रवीण भालेकर, नगरसेवक

Web Title: Traffic Issue Talawade Village