पावसामुळे पुन्हा कोंडी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे शहराच्या वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. विशेषतः दररोज सायंकाळी किंवा रात्रीच्या सुमारास पाऊस होत असल्यामुळे नागरिकांना दोन ते तीन तास वाहतूक कोंडीमध्ये काढावे लागत असल्याचे वास्तव आहे.

पुणे - शहराच्या उपनगरांमध्ये आज सायंकाळी पावसामुळे नागरिकांना पुन्हा एकदा वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. विशेषतः नगर रस्ता, सोलापूर रस्ता, खडकी-बोपोडी या ठिकाणी सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे शहराच्या वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. विशेषतः दररोज सायंकाळी किंवा रात्रीच्या सुमारास पाऊस होत असल्यामुळे नागरिकांना दोन ते तीन तास वाहतूक कोंडीमध्ये काढावे लागत असल्याचे वास्तव आहे. सोमवारी मध्यरात्री व मंगळवारी सायंकाळी जोरदार पावसाने शहराला झोडपले. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली. दिवाळीची खरेदी करून घरी परतणाऱ्या नागरिकांना पावसामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमध्ये अडकावे लागले.

मंगळवारी सायंकाळी शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये वाहतूक संथगतीने सुरू होती. तर, उपनगरांमध्ये ठिकठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाल्याची स्थिती होती. मध्यरात्री व पहाटे झालेल्या पावसामुळे रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आल्याने त्यामध्ये दुचाकी, कारसह खासगी बसही अडकून पडल्या. तर, सायंकाळच्या पावसानेही नागरिकांची तारांबळ उडाली. बोपोडी, खडकी, शिवाजीनगर, गणेशखिंड रस्ता, औंध-बाणेर रस्ता, येरवडा, नगर रस्ता, विमाननगर, सेनापती बापट रस्ता, कोथरूड, वानवडी, हडपसर, पुणे स्टेशन या परिसरात सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.

भाटघरला १२५ मिलिमिटर पाऊस
खडकवासला : खडकवासला धरण परिसरात सोमवारी संध्याकाळी पाचपर्यंत पाऊसच झाला नव्हता. रात्री बारा वाजता पाऊस सुरू झाला. त्यानंतर तीनच्या सुमारास पावसाचा वेग वाढला.  सकाळी सहापर्यंत खडकवासला येथे ३७, पानशेत ५७, वरसगाव ५६ टेमघर येथे ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. भोर तालुक्‍यातील भाटघर धरण परिसरात १२५ मिलिमीटर पाऊस पडला आहे.

जवानांनी केली २३ जणांची सुटका
लोहगाव येथील जकात नाक्‍याजवळ खासगी कंपनीची बस पाण्यामध्ये अडकली. अग्निशामक दलाच्या जवानांनी बसमधील २३ जणांची दोरीच्या साह्याने सुटका केली. अग्निशामक दलाचे जवान रघुनाथ भोईर, महेश मुळीक, उमेश डगळे, विलीन रावतू, सोपान पवार यांनी नागरिकांना सुखरूप बाहेर काढले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic jam due to rain