केशवनगरमधील कचरा विलगीकरण केंद्रामुळे वाहतूक कोंडी 

वृत्तसंस्था
Wednesday, 16 September 2020

पुणे - केशवनगर येथील श्री महागणेशनगरीच्या संरक्षण भिंतीजवळ महापालिकेकडून गावातील कचरा जमा करून कचरा वेचक रस्त्यावरच विलगीकरण करतात. तो कचरा घेण्यासाठी मोठ्या गाड्या येत असल्याने रस्त्यावर वाहनांना जाण्यासाठी अडथळा निर्माण होऊन कोंडी होत आहे,

पुणे - केशवनगर येथील श्री महागणेशनगरीच्या संरक्षण भिंतीजवळ महापालिकेकडून गावातील कचरा जमा करून कचरा वेचक रस्त्यावरच विलगीकरण करतात. तो कचरा घेण्यासाठी मोठ्या गाड्या येत असल्याने रस्त्यावर वाहनांना जाण्यासाठी अडथळा निर्माण होऊन कोंडी होत आहे, तसेच परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. हे विलगीकरण केंद्र दुसरीकडे हलवावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कुणाल लोणकर यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे. 

मुंढवा- मांजरी रस्त्यावर स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कचऱा विलगीकरण केंद्र सुरू केले आहे. गावातून व सोसायट्यांमधून जमा केलेला कचरा लहान टेंपोद्वारे या ठिकाणी आणून तो रस्त्याच्या कडेला वेगळा केला जातो व मोठ्या वाहनांमधून पुढे पाठवला जातो. कचरा वेचकांच्या गाड्या व मोठी वाहने बराच वेळ रस्त्यावरच उभी असतात. त्यामुळे रस्ता अरुंद होतो. या रस्त्यावर वाहनांची नेहमीच वर्दळ असल्याने वारंवार कोंडी होते. 

येथे कचरा पाठविल्यानंतर कचरा रोजच्या रोज पूर्णपणे स्वच्छ केला जात नाही. उरलेला कचरा कुजल्याने परिसरात दुर्गंधी पसरून डास, माशा, चिलटे यांच्या त्रासाने रहिवासी व ये-जा करणारे नागरिक हैराण झाले आहेत. महापालिकेचा आरोग्य विभागाकडे याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून जाणूनबुजून दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 

कचरावेचक महिलांना गावातून हातगाड्या ढकलून आणाव्या लागतात. हा फिडर पॉइंट गावाच्या मध्यभागी येत असल्याने त्यांना सोयीचे होते. गाड्या रस्त्यावर उभ्या राहणार नाहीत, यासाठी वरिष्ठांच्या परवानगीने समोर मोकळ्या प्लॉटमध्ये व्यवस्था केली जाईल. - नितीन कांबळे, आरोग्य निरीक्षक, महापालिका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic jam due to wase merger center in Keshavnagar