पीएमपी बसेसमुळे पुणे महापालिकेसमोर वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

- महापालिकेच्या नव्या इमारतीच्या प्रवेशद्वारासमोरच पीएमपीच्या बस अस्थावेस्थ लावलेल्याने मोठी वाहतूक कोंडी होत आहे.

- वाहनचालकांना याचा फटका बसत असून पीएमपी प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झालेले आहे. 

पुणे : महापालिकेच्या नव्या इमारतीच्या प्रवेशद्वारासमोरच पीएमपीच्या बस अस्थावेस्थ लावलेल्याने मोठी वाहतूक कोंडी होत आहे. याचा फटका वाहनचालकांना बसत असून पीएमपी प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झालेले आहे. 

मेट्रोच्या कामामुळे आधीच वाहतूक विस्कळित झालेल्या या रस्त्यावर बस थांब्यांचे नियोजन न केल्याने बस अक्षरशः रस्त्याच्या मध्यभागी उभ्या राहतात. त्यात एकामागे एक बस थांबत असल्याने कोणती बस आली आणि कोणती निघणार, हे प्रवाशांना समजत नाही. रस्त्याच्या मध्यभागी मेट्रोच्या कामासाठी दोन्ही बाजूला बॅरिकेडिंग केल्याने निम्मा रस्ता वाहतूकीसाठी बंद झाला आहे. अशातच विस्तारित महापालिका भवन इमारतीच्या सीमाभिंत जवळ स्टीलचे बसथांबे बसविण्यात आले आहेत.

परिणामी, महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोरील बसथांब्याच्या समोर चार-चार लाईनमध्ये बस उभ्या केल्या जातात. त्यामुळे रस्त्यावर अडथळा निर्माण होऊन अन्य वाहनचालकांना जाण्यासाठी रस्ता मिळत नाही. यासंदर्भात पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक सुनिल गवळी म्हणाले, "मेट्रोच्या कामामुळे जागा कमी झाल्याने काही गाड्या रस्त्यावर थांबतात. मात्र, येथे येणाऱ्या गाड्या जास्त वेळ थांब्यावर थांबू दिल्या जात नाहीत.'' 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic jam in front of the pune municipality due to PMP buses