पुणे : खडकीत वाहतुकीचा खोळंबा; अग्निशमनची गाडीही अडकली (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर संध्याकाळी सहा वाजल्यापासून प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागला.

खडकी बाजार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर संध्याकाळी सहा वाजल्यापासून प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागला. त्यातच अग्निशामक दलाची गाडी सुमारे अर्धा तास खडकी बाजाराजवळ वाहतूक कोंडीत अडकून पडली होती.

वाहतूक पोलिस व वॉर्डन बेपत्ता असल्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर उतरून अथक परिश्रमानंतर अग्निशामक दलाच्या गाडीला वाट मोकळी करून दिली. त्यांनंतर ही रात्री नऊ वाजेपर्यंत वाहतूक कोंडी सुटली नव्हती.

खडकी बाजार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. वाहतूक पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे खडकीत रोज वाहतूक कोंडी होत आहे. खडकी बाजाराकडे जाणारी वाहतूक बाह्यवळण मार्गे वळवण्यासाठी दोन पोलिस कर्माचारी खडकीत नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र, अनेक वेळा हे पोलिस वाहनचालकांकडून दंड आकरण्यात मग्न असतात.

एका ठिकाणी वळलेली वाहतूक पुन्हा पन्नास मीटर अंतरावरून परत खडकीत येते. त्यामुळे वाहतूक वळवल्याचा फायदा न होता खडकीत वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. याच मार्गावर नेहमी रुग्णवाहिका अडकण्याचे प्रकार घडले आहेत. आजही खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाची अग्निशामक दलाची गाडी वाहतूककोंडीत अडकली होती. त्यावेळी एकही पोलिस कर्मचारी खडकी बाजार परिसरात कुठेही हजर नव्हता.

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने हद्दीतील वाहतूक वळवण्यासाठी नेमलेले वॉर्डन ही पॉईंटवर नव्हते. खडकीतील नागरिकांनी स्वत: रस्त्यावर उतरून वाहतूक नियंत्रण करून अग्निशामक दलाच्या गाडीला वाट मोकळी करून दिली. येथील वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला असून, खडकी वाहतूक पोलिस विभाग याबाबतीत गंभीर नसल्यामुळे येथे कायम वाहतूक समस्या वाढली आहे.  

वाहतूक पोलिस आयुक्तांनी याबाबतीत विचार करून पोलिस अधिकाऱ्यांना सूचना द्याव्या, अशी मागणी येथे उपस्थित वाहनचालक व खडकीतील नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, याबाबत अधिक माहिती घेण्याकरिता खडकी बोपोडी वाहतूक पोलिस विभागाच्या पोलिस निरीक्षक संगीता पाटील याच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic Jam in Khadki Pune