कोंडी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावरील पिंपरी चौकातील ग्रेड सेपरेटरमध्ये कापसाच्या गाठींनी भरलेला ट्रक अडकला, तर तेथून पाचशे मीटरवर असलेल्या मोरवाडी चौकातील ग्रेडसेपरेटरमध्ये कंटेनर अडकला. यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली. ती सर्व्हिस रोडने वळविण्यात आली. त्यामुळे बुधवारी (ता. १८) पहाटेपासूनच पिंपरी चौक ते चिंचवड स्टेशनदरम्यान वाहतूक कोंडी झाली होती. अक्षय तृतीयेच्या दिवशीच हा प्रकार झाल्याने खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांना व नोकरदारांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला.

पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावरील पिंपरी चौकातील ग्रेड सेपरेटरमध्ये कापसाच्या गाठींनी भरलेला ट्रक अडकला, तर तेथून पाचशे मीटरवर असलेल्या मोरवाडी चौकातील ग्रेडसेपरेटरमध्ये कंटेनर अडकला. यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली. ती सर्व्हिस रोडने वळविण्यात आली. त्यामुळे बुधवारी (ता. १८) पहाटेपासूनच पिंपरी चौक ते चिंचवड स्टेशनदरम्यान वाहतूक कोंडी झाली होती. अक्षय तृतीयेच्या दिवशीच हा प्रकार झाल्याने खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांना व नोकरदारांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला.

...अशी अडकली वाहने
पुणे-मुंबई महामार्गावरील ग्रेडसेपरेटरमधून जाण्यास साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या वाहनांना बंदी आहे. तसेच, अवजड वाहनांना या मार्गाने जाण्यास दिवसा बंदी आहे. मात्र रात्री दहा ते सकाळी सहा या दरम्यान त्यांना परवानगी आहे. यामुळे पहाटे पाचच्या सुमारास पुण्याकडे जाणारा कंटेनर ग्रेडसेपरेटरमध्ये अडकला. अधिक उंचीची वाहने ग्रेडसेपरेटरमधून जाऊ नयेत यासाठी नाशिक फाटा येथे लोखंडी बार लावलेला आहे. त्याखालून कापसाच्या गाठी असलेला ट्रक पुढे निघाला. मात्र दोर तुटल्याने गाठी उसळून वर आल्या आणि पिंपरी चौकातील ग्रेड सेपरेटरमध्ये ट्रक अडकला. त्यातील काही गाठी रस्त्यावर पडल्या. गेल्या वर्षी पिंपरी ग्रेडसेपरेटरमध्ये कंटेनर अडकण्याच्या सहा घटना घडल्या होत्या. 

नाशिक फाटा येथे साडेचार मीटरपेक्षा जादा उंचीच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यासाठी लोखंडी बार उभारले आहेत. असेच बार ग्रेडसेपरेटरच्या मर्ज इन जवळ आणि निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात उभारले पाहिजेत. अवजड वाहनांवर मोठी दंडात्मक कारवाई करण्यासाठीचे पावती पुस्तक महापालिकेने पोलिसांना दिलेले नाही.
- सविता भागवत, पोलिस उपनिरीक्षक, पिंपरी वाहतूक विभाग

चालकांविरुद्ध गुन्हे
साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या वाहनांना ग्रेडसेपरेटरमधून जाण्यास बंदी आहे. तरीही कंटेनर नेल्यामुळे तो अडकला आणि वाहतूक कोंडी झाली; तसेच कापसाच्या गाठी असलेला ट्रकही अडकला. त्यामुळे कंटेनर आणि ट्रकचालकाविरुद्ध सार्वजनिक वाहतुकीस अडथळा ठरल्याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचे वाहतूक शाखेच्या पोलिस उपनिरीक्षक सविता भागवत यांनी सांगितले. 

वाहनचालकांचा आततायीपणा समस्येला कारणीभूत
ग्रेडसेपरेटरमध्ये अडकलेला कंटेनर व कापसाच्या गाठींचा ट्रक काढण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पुण्याकडे जाणारी वाहतूक सेवा रस्त्याने वळविली होती. मात्र, काही वाहनचालकांनी घुसखोरी करून वाहने ग्रेडसेपरेटरमधून दामटली.

त्यात दुचाकींसह मोटारी, ट्रक आणि एसटी बसही होत्या. मात्र, एम्पायर इस्टेट येथील पुलाजवळील पंच इन मार्गावर पोलिसांनी बॅरिकेडस्‌ लावून वाहतूक बंद केली होती. त्यामुळे काही मोटारचालकांनी पंच इनमधून उलट्या दिशेने सेवा रस्त्यावर येण्याचा प्रयत्न केला. मोठी वाहने जागेवरच उभी करावी लागली. त्यामुळे कोंडी झाली. हा प्रकार पाहून काही दुचाकीस्वार व मोटारचालक मागे वळाले. उलट्या दिशेने त्यांनी वाहने नेली. त्याचवेळी समोरून वाहने येत होती. त्यामुळे कोंडीत आणखीच भर पडली. मागे वळण्याचा प्रयत्न करण्याचा नादात काही मोटारी तशाच वेड्यावाकड्या अडकून पडल्याने चिंचवड स्टेशन येथील पुण्याकडील मार्गाचा ग्रेडसेपरेटर जाम झाला. त्या मागील सर्व वाहतूक सेवा रस्त्याने वळविल्यामुळे चिंचवड स्टेशनपासून पिंपरी चौकापर्यंत वाहतूक कोंडी झाली. दुपारी तीननंतर वाहने सुरळीत झाली. 

Web Title: traffic jam in pimpri by container