पुणे - नगर रस्त्यावर वाहनांच्या रांगा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

पुणे-नगर रस्त्यावरील खड्डे व त्यात साठलेल्या पाण्यामुळे झालेले अपघात व आठवडे बाजाराची गर्दी यामुळे कोरेगाव भीमा येथे गुरुवारी (ता. 19) सकाळपासूनच वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या.

कोरेगाव भीमा (पुणे) : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे मुसळधार पावसामुळे पुणे-नगर रस्त्यावर खड्डे व त्यात साठलेल्या पाण्यामुळे झालेले अपघात व आठवडे बाजाराची गर्दी यामुळे कोरेगाव भीमा येथे गुरुवारी (ता. 19) सकाळपासूनच वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या.
कोरेगाव भीमा येथे बुधवारपासून पावसामुळे महामार्गावर डिंग्रजवाडी फाटा ते वढू चौकादरम्यान मोठ्या प्रमाणावर पाणी साठले आहे. तर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये अंदाज न आल्याने अनेक दुचाकीचालक पडून अपघातही झाले. यात आठवडे बाजाराची भर पडल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने स्थानिक नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, रुग्ण या सर्वांचेच हाल झाले. वाहतूक सुरळीत होण्यासाठी सरपंच संगीता कांबळे, उपसरपंच प्रकाश ढेरंगे, माजी उपसरपंच जितेंद्र गव्हाणे व ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह तर सहाय्यक पोलिस निरीक्षक मयूर वैरागकर यांनी सहकाऱ्यांसह पुढाकार घेतला. त्यांनी मुरूम टाकून रस्ता दुरुस्ती तसेच वाहतूक सुरळीत केल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला. त्यानंतर आलेले सार्वजनिक बांधकाम खात्याचे कनिष्ठ अभियंता शेळके यांनी येथे मातीमिश्रित मुरूम टाकल्यामुळे रस्त्यावर चिखल वाढल्याचा आरोप नागरिकांनी केला. कोरेगावात रस्त्यावर साठणारे तसेच नागरी वस्त्यांमध्येही साठणारे पावसाचे पाणी वाहून जाण्याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी माजी सरपंच विजय गव्हाणे पाटील, उद्योजक विलासराव गव्हाणे, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष बबुशा ढेरंगे, माजी उपसरपंच कांतिलाल फडतरे व स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात
पावसाळा सुरू होण्यापूर्वीच हमरस्त्यालगतच्या गटारांची स्वच्छता सार्वजनिक बांधकाम विभागाने करणे अपेक्षित असतानाही तसे होत नसल्याने नेमकी ही जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग की ग्रामपंचायत प्रशासनाची?, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. दरम्यान, वढू चौकात पडलेले खड्डे बुजविण्याची जबाबदारीही सार्वजनिक बांधकाम खात्याची असताना कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीनेच वढू चौकात खडी व मुरूम टाकून दुरुस्ती केली. यापुढे सार्वजनिक बांधकाम खात्याने दुरुस्तीबाबत ठोस उपाय न केल्यास ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic Jam On Pune-Nagar Road