पुणे : शिक्रापूरात दिवस ठरला वाहतूक कोंडीचा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

शिक्रापूर (ता. शिरूर) येथे पुणे - नगर रस्त्यावर दोन्ही बाजूंनी रविवारी दिवसभर वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.

तळेगाव ढमढेरे : शिक्रापूर (ता. शिरूर) येथे पुणे - नगर रस्त्यावर दोन्ही बाजूंनी रविवारी दिवसभर वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. चाकण चौकापासून सणसवाडीकडे व पाबळ चौकापासून चोविसावा मैलापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हवालदिल होऊन त्रस्त झाले होते. 

पुणे- नगर रस्त्याच्या दोन्ही बाजूने झालेली वाहतूक कोंडी सोडविताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागत होती. शिक्रापूर येथील वाहतूक कोंडीवर कायमचा तोडगा काढावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. वाहतूक कोंडीमुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत होता. 

शिक्रापूरची वाढलेली लोकसंख्या व त्यामुळे होणारे वाढते नागरीकरण, वाहनांची वाढलेली संख्या, अरुंद रस्ता, विक्रेत्यांचे अतिक्रमण आदी कारणांमुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होत आहे. फुटपाथवर पार्किंग केलेली वाहने, फुटपाथवर दुकानदारांनी ठेवलेले जाहिरातीचे फलक यामुळेही वाहतूक कोंडीला आमंत्रण मिळत आहे.

दिवाळीच्या सुटीमुळे रविवारी दिवसभर व रात्री उशिरापर्यंत शिक्रापूर येथे पुणे-नगर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच्या लाबच रांगा लागल्या होत्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic Jam in Shikrapur Pune