वाहतुकीवरील प्रयोगाचीच "कोंडी' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

कोथरूड - कर्वे रस्त्यावरील अभिनव (नळस्टॉप) चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे महापालिकेने प्रायोगिक तत्त्वावर विविध उपाय योजले. मात्र आठ-पंधरा दिवसांतच ते प्रयोग बंद करण्याची वेळ आली. त्यामुळे कर्वे रस्त्यावरील वाहतुकीची परिस्थिती "जैसे थे' आहे. 

कोथरूड - कर्वे रस्त्यावरील अभिनव (नळस्टॉप) चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे महापालिकेने प्रायोगिक तत्त्वावर विविध उपाय योजले. मात्र आठ-पंधरा दिवसांतच ते प्रयोग बंद करण्याची वेळ आली. त्यामुळे कर्वे रस्त्यावरील वाहतुकीची परिस्थिती "जैसे थे' आहे. 

कोथरूड, कर्वेनगर, वारजे या परिसरात ये-जा करण्यासाठी वाहनचालक कर्वे रस्त्याचा उपयोग करतात. अभिनव चौकात या वाहनांव्यतिरिक्त विधी महाविद्यालय रस्त्यावरून; तसेच म्हात्रे पुलावरून येणाऱ्या वाहनांची भर पडते. त्यामुळे या चौकात चहुबाजूंनी येणारी वाहने तेथील कोंडी वाढवितात. पौड फाटा ते डेक्कनदरम्यानच्या कर्वे रस्त्याची रुंदीही कमी असल्याने वाहनचालकांना संथ वाहतुकीबरोबरच वायूप्रदूषणाचाही सामना करावा लागतो. 

कर्वे रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्यावर अनेकदा वाहतूक पोलिस अभिनव चौकातील वाहतूक नियंत्रक दिवे बंद करून वाहतुकीचे नियोजन करीत असल्याचे दिसून येते. येथील समस्या सोडविण्यासाठी या चौकात उड्डाण पूल बांधण्याचे नियोजन महापालिकेने केले होते;पण स्थानिक व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे तो प्रस्ताव मागे पडला. 

बालभारती ते पौड फाटादरम्यान रस्त्याचे नियोजन महापालिकेने खूप वर्षांपूर्वी केले. मात्र पर्यावरणप्रेमी नागरिकांनी त्या प्रस्तावाला विरोध करीत न्यायालयात धाव घेतली. महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी अभिनव चौकामध्ये चक्राकार वाहतूक पद्धतीचा अवलंब केला. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी नागरिकांच्या त्रासामध्ये भर पडल्याचे निदर्शनास आल्याने तो प्रयोगही बंद करावा लागला. 

कर्वे रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून महापालिकेने जुन्या कालव्यावरील रस्ता तयार केला;पण तो मार्ग अनेक ठिकाणी चौकांना छेदला जातो. त्या चौकात होणारी वाहतुकीची कोंडी; तसेच एसएनडीटी महाविद्यालयासमोर कर्वे रस्त्याला छेदताच येत नसल्याने वाहनचालकांना पौड फाटा उड्डाण पुलाखालून वळसा घालून जावे लागते. विधी महाविद्यालय रस्त्याने येणाऱ्या वाहनचालकांना अभिनव चौकातील वाहतुकीचे दिव्य पार पाडून पुन्हा कालव्यावरील रस्त्यावर जावे लागते. 

इछाशक्तीची गरज 
कालव्यावरील रस्ता कर्वे रस्त्याला छेदण्यासाठी एसएनडीटी महाविद्यालयासमोर ग्रेड सेपरेटर केल्यास अभिनव चौकातील वाहतुकीची कोंडी कमी होऊ शकणार आहे. त्याचबरोबर पाडळे पॅलेस चौकातून निसर्ग हॉटेललगतच्या गल्लीतून जाणाऱ्या वाहनांना पाळंदे कुरिअरजवळ कालव्यावरील मार्ग उपलब्ध करून दिल्यास म्हात्रे पुलाकडून येणारी निम्मी वाहने अभिनव चौकात न जाताच कोथरूड, कर्वेनगरच्या दिशेने जाऊ लागतील व वाहतुकीचा ताण काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. हे बदल करण्यासाठी महापालिकेबरोबरच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीची गरज आहे, असे मत जाणकार व्यक्त करीत आहेत. 

-चहुबाजूंनी येणाऱ्या वाहनांमुळे कोंडी 
-संथ वाहतुकीबरोबरच वायूप्रदूषण 
-चक्राकार वाहतुकीचा प्रयोग फसला 
-विरोधामुळे उड्डाण पुलाला खो 

Web Title: Traffic jams on the experiment