...जेव्हा आंतरराष्ट्रीय कंपनीचे परदेशी "सीईओ' वाहतुक कोंडीत अडकतात! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 traffic police international company ceo stuck in  Mercedes-Benz

...जेव्हा आंतरराष्ट्रीय कंपनीचे परदेशी "सीईओ' वाहतुक कोंडीत अडकतात!

पुणे : पुण्याच्या वाहतुक कोंडीमध्ये सर्वसामान्य नागरीक दररोजच अडकतात, पण त्याची गांभीर्याने दखल घेऊन सुधारणा करतील ते वाहतुक पोलिस कसले ? त्यातही एखादी "व्हिआयपी' व्यक्ती वाहतुक कोंडीत अडकली, तर कित्येक वाहतुक पोलिस दिमतीला हजर राहून नेत्याची पटकन सुटकाही करतात. पण इथे जरा वेगळीच गोष्ट घडली. एका आंतरराष्ट्रीय कंपनीचे परदेशी मुख्य कार्यकारीच (सीईओ) वाहतुक कोंडीत अडकले, एवढेच नव्हे तर हताश होऊन त्यांनी त्यांची "मर्सिडीज' कार सोडून काही अंतर चालत, त्यानंतर रिक्षाने इच्छितस्थळी पोचल्याचा अनुभव थेट "इन्स्टाग्राम'द्वारे पुण्याच्या "ट्रॅफिक'ची लक्तरे वेशीवर टांगली !

मर्सिडीज बेंझ इंडिया या कंपनीचे "सीईओ' मार्टिन श्‍वेंक हे कामानिमित्त पुण्यात आले होते. ते त्यांच्या "मर्सिडीज - एस क्‍लास' या अलिशान वाहनातुन प्रवास करीत होते. सर्वसामान्य पुणेकर दररोज अनुभव घेत असलेल्या वाहतुक कोंडीमध्ये श्‍वेंक यांचीही कार सापडली. श्‍वेंक यांनी काही वेळ कारमध्ये बसून वाहतुक सुरळीत होण्याची वाट पाहिली. मात्र बराच वेळ होऊनही वाहतुक सुरळीत होत नसल्याने अखेर श्‍वेंक हे त्रस्त झाले. त्यांच्या इच्छितस्थळी वेळेत पोचायचे असल्याने त्यांची धडपड सुरु होती. अखेर हताश होऊन, त्यांनी त्यांच्या अलिशान कारमधून उतरून थेट पायी चालण्यास सुरुवात केली. एक किलोमीटर अंतर चालत गेल्यानंतर त्यांना एक ऑटोरिक्षा करून ते आपल्या इच्छितस्थळी पोचले. दरम्यान, श्‍वेंक यांनी आपला हा अनुभव "इन्स्टाग्राम'वर मांडला.

श्‍वेंक यांनी ऑटो रिक्षा राईडचे एक छायाचित्र इन्स्टाग्रामवर टाकले. त्यामध्ये त्यांनी "जर तुमची एस-क्‍लास कार पुण्याच्या अप्रतिम रस्त्यांवर ट्रॅफिकमध्ये अडकली असेल तर तुम्ही काय कराल? कदाचित तुम्ही कार सोडाल, काही किलोमीटर पायी चालण्यास सुरुवात कराल आणि त्यानंतर तुम्ही ऑटो रिक्षा '' असा अनुभव छायाचित्रासमवेत मांडून पुण्याच्या वाहतुक कोंडीची परिस्थिती जगासमोर मांडली.श्‍वेंक हे 2018 पासून "मर्सिडीज-बेंझ इंडिया'चे "सीईओ' आहेत. त्यापूर्वी त्यांनी "मर्सिडीज-बेंझ चीन'चे "सीईओ' म्हणूनही काम केले आहे.