वाहतूक पोलिसांवरील भिस्त फोल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

शहराच्या मध्य भागातील नागरिकांच्या गटांची ‘सकाळ’ने नुकतीच बैठक घेतली. त्यातून मध्य भागातील नागरिकांना अनेक समस्या भेडसावत असल्याचे दिसून आले. त्यांची सोडवणूक झाली तर मध्य पुणे मोकळेपणाने श्‍वास घेऊ शकेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. या समस्यांचा आढावा या वृत्तमालिकेद्वारे आजपासून.

शहराच्या मध्य भागातील नागरिकांच्या गटांची ‘सकाळ’ने नुकतीच बैठक घेतली. त्यातून मध्य भागातील नागरिकांना अनेक समस्या भेडसावत असल्याचे दिसून आले. त्यांची सोडवणूक झाली तर मध्य पुणे मोकळेपणाने श्‍वास घेऊ शकेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. या समस्यांचा आढावा या वृत्तमालिकेद्वारे आजपासून.

पुणे - अरुंद रस्ते आणि त्यात उदंड अतिक्रमणे, नियमांचे सर्रास होणारे उल्लंघन दाट लोकवस्तीच्या मुसक्‍या आवळत आहे. व्यापाऱ्यांपासून रहिवाशांपर्यंत सर्वांनाच त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी या भागातील रहिवाशांची वाहतूक पोलिसांवर भिस्त असली तरी ती फोल ठरत असल्याचे चित्र आहे. 

शहराच्या मध्य भागात म्हणजे नेहरू रस्ता, नेहरू चौक, बोहरी आळी, गणेश पेठ, गुरुवार पेठ, गूळ आळी, सतरंजीवाला चौक, कस्तुरे चौक, पांगुळआळी, नाना पेठ, रविवार पेठ, कसबा पेठ, तपकीर गल्ली, तुळशीबाग, सदाशिव-नारायण पेठेचा काही भाग या ठिकाणी सातत्याने वाहतुकीची कोंडी होताना दिसते. सणांच्या दिवसांत तर या भागातील वाहतूक कोंडी अधिक उग्र रूप धारण करते. दर शनिवार-रविवारीही येथील कोंडी वाढते. मध्य भागात जुन्या घरांची संख्या मोठी आहे; तसेच रस्ते अरुंद आहेत. त्यातच या परिसरात पुरेसे वाहनतळ नाहीत. त्यामुळे रहिवाशांना त्यांची वाहने रस्त्यावरच उभी करावी लागतात. त्यातूनच रहिवासी आणि दुकानदार यांच्यात सातत्याने संघर्ष होतो. या अरुंद रस्त्यांवर अनेकदा वाहने बेशिस्तपणे उभी केली जातात. त्याचा वाहतुकीला अडथळा होतो. शहराच्या पश्‍चिम भागात वाहतूक पोलिसांकडून ‘नो पार्किंग’मधील वाहनांवर सातत्याने कारवाई होते. मात्र, पूर्व भागात कारवाई मंदावते, असा रहिवाशांचा अनुभव आहे. या भागातील व्यापाऱ्यांनाही त्यांच्या दुकानात माल उतरवायचा असेल, तर रात्रीच त्याची वाहतूक करावी लागते. 

मध्य भागातील रस्ते अरुंद आहेत. त्यातच पदपथ रुंद करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता अरुंद झाला आहे. वाहने कोठेही उभे राहतात. पथारीवाल्यांची संख्या वाढत आहे. 
- सुरेंद्र जैन, अध्यक्ष, रिटेल टेक्‍सटाइल गार्मेंट सिंडीकेट

मध्य भागात पथारीवाल्यांची संख्या वाढत आहे. त्यातच बेशिस्त वाहनांवर पुरेशी कारवाई होत नाही. त्यामुळे पादचाऱ्यांनाही नीट चालता येत नाही. कोंडी होणाऱ्या चौकांत वाहतूक पोलिस हवेत.  
- हनीफ जाफरानी, अध्यक्ष, आयर्न अँड स्ट्रील असो.

Web Title: Traffic Police Ravivar Peth Road