वाहतूकशिस्त मोडणाऱ्या पोलिसांवर मेहरबानीच

ब्रिजमोहन पाटील
बुधवार, 22 मे 2019

प्रवेशापुरता हेल्मेटचा वापर 
पोलिस आयुक्तालयात दुचाकीस्वारांना हेल्मेट शिवाय प्रवेश नाही. अनेक जण आयुक्तालयाच्या जवळ आले की हेल्मेट घालतात, तसेच आयुक्तालयातून बाहेर पडले की ते काढून ठेवतात. ज्यांना हेल्मेट वापरायचे नाही ते पोलिस आयुक्तालयाबाहेर गाड्या लावतात ही वस्तुस्थिती आहे.

पुणे - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करत त्यांना दणका दिला जात आहे. मात्र शिस्तभंग करणाऱ्या पोलिसांवर मेहरबानी केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांना हेल्मेटसक्तीसह इतर नियमांचे पालन करण्याचा लेखी आदेश दिला असतानाही अनेकांकडून त्याचे पालन होत नाही. असे असले तरी अद्याप फक्त पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे. 

जानेवारीपासून पुण्यात हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच प्रमाणे नो एंट्री, राँग साइडने गाडी चालविणे, चकीच्या ठिकाणी पार्किंग करणे, सीट बेल्ट न लावणे, दारू पिऊन गाडी चालविणे यावर जोरदार कारवाई सुरू आहे. वाहतूक नियमनाकडे दुर्लक्ष करून आठ-दहा पोलिस घोळक्‍याने थांबून नागरिकांवर कारवाई करतात. यावर पुणेकरांनी टीका करूनही त्याकडे काणाडोळा करत वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरूच ठेवली आहे. 

एकीकडे पुणेकरांना शिस्त लावत असताना दुसरीकडे पोलिसांकडून सर्रास वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. या पार्श्‍वभूमीवर १३ मे रोजी पोलिस मुख्यालयात झालेल्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर १४ मे रोजी याबाबत लेखी आदेश काढून सर्व पोलिसांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. विनाहेल्मेट, सिंग्नल तोडणे, नो पार्किंग, झेब्रा कॉसिंग, सिट बेल्ट, बुलेट सायलेंसर यांसह अन्य वाहतूक नियामांचा भंग केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी.

ज्या पोलिसांवर कारवाई केली आहे त्यांची नावे लेखी स्वरूपात नियंत्रण कक्षाला कळवावीत. त्यानंतर संबंधित विभागाच्या पोलिस उपायुक्तांशी पत्रव्यवहार करून पुढील कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे. त्यामुळे पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वाहतूक नियम तोडू नये असा आदेश देण्यात आला आहे. हा आदेश काढल्यानंतर पोलिस आयुक्तालयासह, पोलिस ठाण्यांच्या परिसरात, सिग्नलवर विनाहेल्मेट दुचाकी चालविणारे पोलिस निदर्शनास येतात, पण त्यांच्यावर कारवाई केली जात नाही ही वस्तुस्थिती आहे. 

वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज देशमुख म्हणाले, ‘‘पोलिसांनी वाहतूक नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. आतापर्यंत पाच जणांवर कारवाई केली आहे. यापुढेही ही अशाप्रकारे कारवाई केली जाईल.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic Police Rule Helmet Crime