राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फोडणार वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

शहर आणि परिसरातील वाहतुकीच्या कोंडीने हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घेतला आहे. १५ ते २५ ऑगस्ट दरम्यान शहरातील सुमारे १० हजार स्वयंसेवक वाहतुकीच्या समस्येचा अभ्यास करणार आहेत.

पुणे - शहर आणि परिसरातील वाहतुकीच्या कोंडीने हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घेतला आहे. १५ ते २५ ऑगस्ट दरम्यान शहरातील सुमारे १० हजार स्वयंसेवक वाहतुकीच्या समस्येचा अभ्यास करणार आहेत. ती सोडविण्यासाठीचा आराखडा तज्ज्ञांच्या मदतीने करण्यात येणार असून, त्याचे १५ सप्टेंबरपर्यंत महापालिका आणि वाहतूक पोलिसांना सादरीकरण करण्यात येणार आहे. 

संघाचे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, महानगर कार्यवाह महेश कर्पे, सेवा विभागाचे पश्‍चिम प्रांताचे प्रमुख शैलेंद्र बोरकर, जनकल्याण समितीचे पश्‍चिम महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष तुकाराम नाईक यांनी या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कर्पे म्हणाले, ‘‘कोंडी नेमकी कशामुळे होती, त्याला जबाबदार कोण आदींचा अभ्यास केला जाणार आहे. सुमारे ३०० शाखांमधील १० हजार स्वयंसेवक आणि ९२ स्वयंसेवी संस्था यामध्ये सहभागी होणार आहेत.’’

समस्यांचे संकलन झाल्यावर त्या सोडविण्यासाठी तज्ज्ञांच्या मदतीने तयार होणारा आराखडा १५ सप्टेंबरपर्यंत महापालिका आणि वाहतूक पोलिसांना सादर करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. गेल्या तीन महिन्यांपासून या बाबतच्या उपक्रमाची तयारी सुरू आहे. त्याचप्रमाणे वाहतुकीच्या नियमांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी तीन लाख कुटुंबांपर्यंत पत्रकांद्वारे पोचण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. पुणे- नगर रस्त्यावर वाघोलीमध्ये ग्रामपंचायत, लोकसहभागातून तेथील कोंडी काही प्रमाणात सोडवता आली. त्या बाबतचे प्रयत्न अद्याप सुरू आहेत. या प्रयोगातून प्रेरणा घेऊन शहराच्या वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. 

कोल्हापूर, सांगलीत स्वच्छता मोहीम 
कोल्हापूर, सांगली, सातारा येथील पूर ओसरत असला तरी तेथे आता स्वच्छतेचा मोठा प्रश्‍न आहे. त्यासाठी स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्यासाठी संघाने केलेल्या आवाहनाला दोन दिवसांत १२०० नागरिकांनी नोंदणी करून प्रतिसाद दिला आहे. तीन दिवस तेथे जाऊन ते स्वच्छतेचे काम करणार आहेत. तसेच संघाचे १४०० स्वयंसेवकही त्यात सहभागी होतील. या तिन्ही जिल्ह्यांतील २८० गावांत प्रत्येकी ८ नागरिक- स्वयंसेवकांचा एक गट, मंगळवारपासून स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहे. तेथे ३ हजार कार्यकर्ते सध्या मदत कार्यात सहभागी झाले आहेत, अशी माहिती बोरकर आणि नाईक यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic Solve by RSS Pune