पुणे : कर्वे रस्त्यावर आजपासून चक्राकार वाहतूक 

 विनायक बेदरकर
शनिवार, 8 डिसेंबर 2018

कोथरूड : नळस्टॉप चौकात नव्याने उभारण्यात येणाऱ्या दुहेरी उड्डाणपुलाच्या कामास सुरुवात करण्यासाठी आज (ता.8) मध्यरात्रीपासून चौकातील वाहतूक वळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी चक्राकार वाहतूक किंवा आहे त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करून रस्ता उपलब्ध करून देण्याच्या पर्यायांचा विचार सुरू आहे.
 

कोथरूड(पुणे) : कर्वे रस्त्यावरील अभिनव (नळस्टॉप) चौकात नव्याने उभारण्यात येणाऱ्या दुहेरी उड्डाणपुलाच्या कामास सुरुवात करण्यासाठी आजपासून शनिवारी मध्यरात्रीपासून चौकातील वाहतूक वळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी चक्राकार वाहतूक किंवा आहे. त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करून रस्ता उपलब्ध करून देण्याच्या पर्यायांचा विचार सुरू आहे. या दोन्ही पर्यायांची दोन ते तीन दिवस प्रायोगिक चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक वळविण्यात येणार असल्याचे 'महामेट्रो' व्यवस्थापनाने स्पष्ट केले.

शनिवारी सकाळी साडेअकरा पासून बॅरिगेट लावून रस्त्यावर चक्राकार वाहतूक योजनेची चाचणी घेण्यास सुरुवात करण्यात आल्यानंतर कर्वे रस्त्यावर पंधरा मिनिटांतच वाहनांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली आहे.

अशी असेल चक्राकार वाहतूक
- कर्वे रस्त्याकडून डेक्कनकडे जाणाऱ्या वाहनांनी कर्वे रस्त्यावरून 'एसएनडीटी' महाविद्यालायच्या समोरून लॉ कॉलेज रस्त्याने आठवले चौकात जावे.
- तेथून उजवीकडे वळसा घेऊन ही वाहने पुन्हा अभिनव चौकात येऊ शकतील.
- एकेरी वाहतूक करण्यासाठी 'एसएनडीटी' महाविद्यालय ते अभिनव चौकापर्यंत डेक्कनकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. डेक्कनकडून कर्वे रस्त्याने जाणारी वाहतूकही पूर्ववत ठेवण्यात येईल.

असे असेल बॅरिकेडिंग
- वाहतूक पोलिसांनी यापूर्वीही चक्राकार वाहतुकीच्या पर्यायाचा विचार केला होता. मात्र, नागरिकांकडून विरोध झाल्यानंतर तो गुंडाळण्यात आला.या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गाचा विचार केला आहे. महामेट्रोने कर्वे रस्त्यावर साडेआठ मीटर अंतराचे बॅरिकेडिंग करून उर्वरित रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात येणार आहे. नळस्टॉप चौकातही दोन्हीकडून बॅरिकेडिंग करून रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात येईल. त्याची चाचपणी केल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल.
- बॅरिकेडिंग केल्यानंतर वाहनांसाठी सरासरी पाच ते सात मीटरचा रस्ता उपलब्ध राहणार आहे. कर्वे रस्त्यावरील वाहनांची संख्या पाहता होणाऱ्या संभाव्य कोंडीचीही चाचपणी केली जाणार आहे. या पर्यायाचा यशस्वी विचार झाल्यास रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील फूटपाथ काढून वाहनांसाठी रस्ता मोठा करण्यात येईल.
 

Web Title: traffic turning Ring on Karve road from today