#PuneFlood संततधार पावसामुळे ३४ रेल्वेगाड्या रद्द

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

 पावसामुळे पुण्यातून मुंबई, सोलापूर, मनमाड आणि मिरज मार्गांवर धावणाऱ्या ३४ रेल्वेगाड्या सोमवारी रद्द झाल्या आहेत.

पुणे - पावसामुळे पुण्यातून मुंबई, सोलापूर, मनमाड आणि मिरज मार्गांवर धावणाऱ्या ३४ रेल्वेगाड्या सोमवारी रद्द झाल्या आहेत. मुंबई मार्गावरील १२ गाड्यांचाही त्यांत समावेश आहे. मुंबई मार्गावर इंद्रायणी, प्रगती, डेक्कन क्विन, सिंहगड एक्‍स्प्रेस या गाड्या मंगळवारी धावण्याची शक्‍यता कमी असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. पीएमपीच्याही ४०० फेऱ्यांना फटका बसला, तर टॅक्‍सी सेवेवर विपरीत परिणाम झाला. 

पुण्याहून मुंबई, मिरज (कोल्हापूर), सोलापूर आणि मनमाड मार्गांवर रेल्वे धावतात. पावसामुळे चारही मार्गांवर विविध बदल करण्यात आले. त्यामुळे या मार्गांवरील बंगळूर, इंदोर, कोल्हापूर, मिरज, नांदेड, कोलकता आदी शहरांसाठीच्या गाड्या सोमवारी रद्द करण्यात आल्या. सिंहगड, इंद्रायणी, डेक्कन क्विन, प्रगती सोमवारीही रद्द झाल्या. मंगळवारी त्या धावू शकतील का, याबाबत साशंकता आहे. मुंबईत ठाणे, कल्याण परिसरात लोहमार्गांवर पाणी साठले आहे, त्यामुळे अनेक गाड्या थांबवून ठेवल्या आहेत. तसेच खंडाळा, खोपोली दरम्यान लोहमार्गावर दरड कोसळली आहे, त्यामुळेही पुणे-मुंबई वाहतूक विस्कळित झाली आहे. पावसाचा जोर कमी झाल्यावर टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरळीत होईल, अशी अपेक्षा मध्य रेल्वेचे पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी व्यक्‍त केली. 

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी म्हणाले, ‘‘कर्जत ते लोणावळा दरम्यान ९ ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. त्यातील सहा ठिकाणी काम पूर्ण होत आले आहे. उर्वरित ठिकाणीही लवकरच काम पूर्ण होईल. ते झाल्यावर मंगळवारी पुणे-मुंबई मार्गावर काही प्रमाणात वाहतूक सुरळीत होईल.’’ दरम्यान रेल्वेसेवा विस्कळित झाल्यामुळे पुणे स्थानकावर रेल्वेगाड्या आणि प्रवाशांचीही गर्दी सोमवारी सायंकाळी झाली  होती.

रेल्वे प्रशासन झोपले होते का?
रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा म्हणाल्या, ‘‘मुंबईत दरवर्षी पाऊस पडतो, लोणावळा- खंडाळा घाटात दरवर्षी दरड कोसळते, हे रेल्वे प्रशासनाला माहिती आहे. गेल्या वर्षीच घाटामध्ये ७ कोटी रुपये खर्च करून दरड कोसळणार नाही, अशी व्यवस्था केली होती, त्याचे काय झाले? पाणी साठणारी ठिकाणे रेल्वेला माहिती नाहीत का? मात्र, निष्काळजीपणा करून गैरव्यवहार करण्यासाठी रेल्वेचे अधिकारी दुर्लक्ष करतात अन्‌ त्याचा फटका प्रवाशांना बसतो.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trains canceled due to rains