तळेगावात वाहतूक नियंत्रण शाखेचे स्थलांतर करावे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

तळेगाव स्टेशन - पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत नव्याने अस्तित्वात आलेल्या देहूरोड-तळेगाव विभागातील वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिस निरीक्षकांचे कार्यालय वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता तळेगाव स्टेशनला स्थलांतरित करण्याची नागरिकांची मागणी आहे.

तळेगाव स्टेशन - पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत नव्याने अस्तित्वात आलेल्या देहूरोड-तळेगाव विभागातील वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिस निरीक्षकांचे कार्यालय वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता तळेगाव स्टेशनला स्थलांतरित करण्याची नागरिकांची मागणी आहे.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

पोलिस आयुक्तालयांतर्गत कार्यक्षेत्रातील महत्त्वाच्या ठिकाणी स्वतंत्र वाहतूक नियंत्रण शाखा कार्यान्वित झाली आहे. तसेच चाकण वाहतूक नियंत्रण शाखेसाठी स्वतंत्र पोलिस निरीक्षक, तर देहूरोड आणि तळेगावसाठी संयुक्त पोलिस निरीक्षकाची नियुक्ती झाली आहे. त्यांचे कार्यालय देहूरोड-कात्रज बायपासवरील सेन्ट्रल चौकात आहे. रहदारी आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेता देहूरोडपेक्षा तळेगावला सर्वाधिक वाहतूक नियमनाची गरज आहे. तळेगाव-चाकण महामार्गाखेरीज शहरात अनेक ठिकाणी बेशिस्त वाहनचालक आणि अति रहदारीमुळे सातत्याने कोंडी होत असते. यापूर्वी शहरातील वाहतुकीचे नियमन स्थानिक वाहतूक पोलिसांकडून केले जात असे. त्यामुळे रात्री, अपरात्री वाहतूक कोंडी अथवा अपघात झाल्याची माहिती मिळताच ते त्वरेने घटनास्थळी हजर होऊन कार्यवाही करत. मात्र, आता माहिती मिळाल्यानंतर देहूरोडहून पोचण्यास त्यांना विलंब होतो. कधीकधी प्रतिसादही मिळत नाही. म्हणूनच वाहतूक नियंत्रण शाखा पोलिस निरीक्षक कार्यालय, तळेगाव स्टेशनला स्थलांतरित व्हावे, अशी तळेगावकरांची मागणी आहे.

देहूरोडच्या तुलनेत तळेगाव स्टेशनची वाहतूक समस्या गंभीर आहे. त्यामुळे सुरळीत नियमनासाठी वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिस निरीक्षकांचे कार्यालय तळेगाव स्टेशनला असायला हवे.
- किरण ओसवाल, अध्यक्ष, व्यापारी संघटना

तळेगाव दाभाडे आणि देहूरोड परिसरातील रहदारी आणि वाहतूक समस्यांची लवकरच प्रत्यक्ष पाहणी करून, त्याअनुषंगाने उपाययोजना केल्या जातील.
- नीलिमा जाधव, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा

Web Title: Transferring the traffic control branch in Talegaon