शिक्षण उपसंचालक कार्यालयांतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

बदलीचा नियम बदलणार
सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदलीचा नियम तीन वर्षांचा आहे. परंतु, उपसंचालक कार्यालयात पाच वर्षांपासून अधिककाळ अनेक कर्मचारी ठाण मांडून आहेत. बदल्यांच्या नियमात बदल प्रस्तावित केला आहे. सध्या कार्यालयातील टेबल तीन वर्षांनी बदलला जातो आणि सहा वर्षांनी कार्यालयातून बदली केली जाते; यापुढे बदली जिल्ह्याबाहेर केली जाणार आहे.

पुणे - पुण्याच्या विभागीय उपसंचालक कार्यालयात वर्षानुवर्षे ठाण मांडून गैरकारभाराला खतपाणी घालणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात येणार आहेत. शिक्षण आयुक्तांनी नियमांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाला पाठविला आहे. यामुळे राज्यातील सर्वच शिक्षण उपसंचालक कार्यालयांतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होण्याची चिन्हे आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यातील शिक्षण उपसंचालक कार्यालयात लाचखोरी प्रकरणानंतर शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी राज्यातील सर्व उपसंचालक कार्यालयांच्या झाडाझडतीचे आदेश दिले आहेत. प्रभारी उपसंचालक प्रवीण अहिरे यांच्याकडील कार्यभार काढून घेतला होता. त्यांचा सहायक शिक्षण संचालक हा मूळ पदाचा कार्यभारही काढून घेतला आहे.

शिक्षण संचालक दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथक पुण्यातील कार्यालयाची तपासणी करीत आहे. कर्मचाऱ्यांनी विहित वेळेत पूर्ण करायची कामे केली आहेत का, कामे प्रलंबित का आहेत याची दखल तपासणीत घेतली जाणार आहे. उपसंचालक कार्यालयापाठोपाठ शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे काम करणाऱ्या वेतन पथक कार्यालयाची तपासणीही करण्यात येत आहे.

बदल्यांच्या नियमाचा आधार घेऊन एकाच ठिकाणी ठाण मांडलेले कर्मचारी आता जिल्ह्याबाहेर पाठविले जातील, त्यासाठी नियमात बदल प्रस्तावित केला आहे. दैनंदिन कामकाज आणि वर्तणूक याविषयी तक्रारी असलेल्या कर्मचाऱ्यांनाही पाठविले जाईल.
- विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transfers of employees in the offices of the Deputy Director of Education