पिंपरी चिंचवडमधील शिक्षकांच्या होणार बदल्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 जानेवारी 2020

शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी शिक्षकांच्या बदल्या करणे आवश्‍यक आहे. एखाद्या हुशार शिक्षकाचा इतर शाळांनाही उपयोग होणे गरजेचे आहे. तसेच अनेक शिक्षकांची मक्तेदारी मोडीत काढणे आवश्‍यक आहे.
- भाऊसाहेब भोईर, सदस्य, शिक्षण समिती

पिंपरी - राज्य सरकारच्या नियमानुसार तीन वर्षांनी शिक्षकांच्या बदल्या होणे आवश्‍यक आहे. मात्र महापालिकेच्या अनेक प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये अनेक शिक्षक नगरसेवकांच्या वरदहस्तामुळे तीन वर्षांहून अधिककाळ एकाच शाळेत ठाण मांडून आहेत. अशा ३०० शिक्षकांची बदली होणार आहे. शिक्षण समितीने घेतलेल्या या निर्णयामुळे अशा शिक्षकांचे धाबे दणाणले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिक्षण समितीच्या सभेत सदस्य भाऊसाहेब भोईर यांनी हा प्रस्ताव ठेवला आहे. नगरसेवकांच्या आशीवार्दाने अनेक शाळांमध्ये काही शिक्षक १० वर्षे कार्यरत असल्याचे प्रशासनाच्या निर्दशनास आले आहे. त्यानुसार तीन वर्षे पूर्ण केलेल्या शिक्षकांची यादी तयार केली आहे. शिक्षकांच्या बदल्या करण्याबरोबरच पर्यवेक्षकांची पदे भरताना नियमाप्रमाणे सेवाज्येष्ठतेने भरावीत. तसेच राज्य सरकारकडून अतिरिक्त म्हणून पाठविलेल्या शिक्षकांची भरती न करता रीतसर जाहिरात देऊन शिक्षक भरती करण्यात यावी, याशिवाय उर्दू माध्यमांच्या ४३ जागा व हिंदी माध्यमांचा १५ जागा रोस्टर पूर्ण करून भरती करण्यात यावी, असे ठराव मंजूर झाले आहेत.

शिक्षण विभागाच्या प्रशासनाने राजकीय दबाव झुगारत नुकत्याच ऑनलाइन पद्धतीने एकाच शाळेत गेल्या १५ वर्षे ठाण मांडलेल्या शिक्षकांच्या विरोधात कारवाई केली होती. बदलीस पात्र व विनंतीसाठी ऑनलाइन माहिती भरणे आवश्‍यक होते. पण तसा अर्ज शिक्षकांनी केला नव्हता, त्या वेळी सोयीच्या ठिकाणी बदल्या न मिळाल्याने अनेक शिक्षक बदली रद्द करण्यासाठी नगरसेवकांच्या शिफारशी घेऊन शिक्षण विभागात हेलपाटे मारत होते. परंतु त्या बदलीपत्रावर आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या स्वाक्षरी असल्याने हा दबाव फार काळ टिकला नाही. बदली झालेल्यांमध्ये ४४ मराठी माध्यमाचे, दोन उर्दू माध्यमातील शिक्षक आहेत. त्यापैकी मराठी माध्यमाच्या एका शाळेत १४ ते २५ वर्षे अध्यापन करत असलेल्या ३३ उपशिक्षकांचा समावेश आहे. तर १० ते २० वर्षे एकाच शाळेत असलेल्या १२ पदवीधर शिक्षक, तर उर्दू माध्यमिक शाळांमधील दोन उपशिक्षकांचीही बदली झाली आहे. ज्या शाळांमध्ये रिक्त जागा आहेत, तेथे या शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transfers of teachers in Pimpri Chinchwad