पीएमआरडीए राबविणार "ट्रान्सफॉर्म पुणे' अभियान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

पुणे - पुणे महानगर प्रदेश प्राधिकरण (पीएमआरडीए) हे केवळ बांधकामांना परवानगी देणे, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे, इतक्‍यापुरते मर्यादित नाही; तर सर्वंकष आर्थिक विकास आराखडा तयार करून नगरनियोजन, सार्वजनिक वाहतुकीचे सक्षमीकरण आणि पर्यावरणाचा समतोल राखणेदेखील प्राधिकरणाचेच काम आहे. यात लोकसहभाग वाढविण्यासाठी "ट्रान्सफॉर्म पुणे' हे अभियान राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, विद्यार्थी आणि नागरिकांकडून संकल्पना घेतल्या जाणार असल्याची माहिती प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.

शहरातील सार्वजनिक वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचे काम पीएमआरडीएकडून "दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन' (डीएमआरसी) यांच्या सहकार्याने मार्गी लावण्यात येणार आहे. तसेच नदीसुधार आणि प्रस्तावित रिंगरोडचेदेखील काम युद्धपातळीवर केले जाणार आहे. पीएमआरडीएचे फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून जनसंपर्क वाढविण्यात येणार आहे. शहरातील विद्यार्थी आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने नगरनियोजनामध्ये संकल्पनांचे आदान प्रदान "ट्रान्सफॉर्म पुणे' अभियानाअंतर्गत केले जाईल. लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमानतेसाठी "पीएमआरडीए' ब्रॅन्डिंगवर भर देण्यात येणार असल्याचेही गित्ते यांनी या वेळी सांगितले.

औद्योगिक क्षेत्र विकसित करणार
आर्थिक गुंतवणूक आणि उद्योगवाढीसाठी हिंजवडीच्या धर्तीवर पीएमआरडीएच्या क्षेत्रामध्येदेखील औद्योगिक क्षेत्र (इंडस्ट्रिअल बिझनेस डिस्ट्रिक्‍ट) विकसित करण्यात येणार आहे. ते प्रस्तावित विमानतळ, रिंगरोड आणि मेट्रोला जोडण्याचे नियोजन केले जाईल, असेही किरण गित्ते यांनी सांगितले.

Web Title: transform pune campaign by pmrda