ट्रान्सफॉर्मर स्फोटाचा अहवाल खोटा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

पुणे - खराडी येथील झेन्सार कंपनीच्या समोरील ट्रान्सफॉर्मरच्या स्फोट प्रकरणात ऊर्जा विभागाच्या विद्युत निरीक्षकांनी दिलेला अहवाल खोटा असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या स्फोटाची आणि त्यामध्ये मरण पावलेल्या दोघांची जबाबदारी महावितरणवर नको, या हेतूने हा खोटा अहवाल सादर करण्यात आला असावा, अशा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. 

पुणे - खराडी येथील झेन्सार कंपनीच्या समोरील ट्रान्सफॉर्मरच्या स्फोट प्रकरणात ऊर्जा विभागाच्या विद्युत निरीक्षकांनी दिलेला अहवाल खोटा असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या स्फोटाची आणि त्यामध्ये मरण पावलेल्या दोघांची जबाबदारी महावितरणवर नको, या हेतूने हा खोटा अहवाल सादर करण्यात आला असावा, अशा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. 

खराडी येथील झेन्सार कंपनीच्या समोरील पदपथावर असलेल्या ट्रॉन्सफॉर्मरचा ११ मे रोजी दुपारी स्फोट झाला होता. त्यात माहिती-तंत्रज्ञान कंपनीतील कर्मचारी प्रियांका झगडे आणि पंकज खुणे हे गंभीर जखमी झाले होते.

उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या स्फोटाची जबाबदारी सुरवातीला महावितरणने झटकली होती. मात्र पोलिसांनी केलेला तपास आणि ऊर्जा विभागाने सादर केलेल्या फेरतपासणी अहवालातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.

या अहवालामध्ये महावितरण आणि ऊर्जा विभागाचे अधिकारी व कर्मचारी दोषी असल्याचे समोर आले आहे. 

या ट्रान्सफॉर्मरच्या शेजारी असलेल्या स्टॉलमधील सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही घटना घडल्याचा दावा सुरवातीला महावितरणने केला होता. 
तथापि, स्टॉलमधील सिलिंडरचा स्फोट झाला नसल्याचे फेरअहवालातून स्पष्ट झाले आहे. ट्रान्सफॉर्मरला येऊन जोडणाऱ्या वीज वाहिन्यांमध्ये दोष निर्माण झाल्याने त्यातून हा स्फोट झाला. या स्फोटामुळे लागलेल्या आगीत झगडे आणि खुणे भाजल्याचे यात म्हटले आहेत. यावरून विद्युत निरीक्षकांनी जो अहवाल दिला आहे, तो खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

केबल गायब
ऊर्जा विभागाने दिलेल्या फेरतपासणी अहवालात ट्रान्सफॉर्मरमधील ज्या केबलमुळे स्फोट झाला, त्या महावितरणने टाकून दिल्याचे समोर आले आहे. हा प्रकार दडपण्यासाठी केबल गायब केल्या असल्याचे बोलले जात आहे. 

मृतांना भरपाई मिळणार का?
या स्फोटात मरण पावलेल्या प्रियांका झगडे आणि पंकज खुणे यांच्या कुटुंबीयांना महावितरणकडून कोणतीही भरपाई मिळालेली नाही. कारण यामध्ये महावितरणचा दोष नसल्याचे कारण पुढे करण्यात आले होते. परंतु, महावितरणच्या निष्काळजीपणामुळे हा स्फोट झाल्याचे नव्याने समोर आले आहे. त्यामुळे या दोघांच्या कुटुंबीयांना भरपाई मिळण्याची शक्‍यता आहे. महावितरण ती देणार का, असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.

विद्युत निरीक्षकांनी दिलेल्या अहवालात अनेक त्रुटी असल्याचे फेरअहवालावरून दिसून आले आहे. त्यामुळे संबंधित विद्युत निरीक्षकांना याबाबत विचारणा केली जाईल. तसेच या घटनेस जबाबदार असणारे महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती गोळा झाली आहे. त्यानुसार कारवाई केली जाईल. 
- राजेंद्र मुळीक, पोलिस निरीक्षक, चंदननगर पोलिस ठाणे.

Web Title: transformer blast report falce