ट्रान्स्पोर्ट हबचे काम मेट्रो करणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

पुणे - मेट्रोपासून रिक्षापर्यंत... शॉपिंग मॉल ते कमर्शिअल कॉम्प्लेक्‍स असलेले ट्रान्स्पोर्ट हब स्वारगेट येथे उभारले जाणार आहे. त्याचे भूमिपूजन याच महिन्यात होईल. सुमारे १६०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे काम मेट्रो कंपनी करणार आहे.

पुणे - मेट्रोपासून रिक्षापर्यंत... शॉपिंग मॉल ते कमर्शिअल कॉम्प्लेक्‍स असलेले ट्रान्स्पोर्ट हब स्वारगेट येथे उभारले जाणार आहे. त्याचे भूमिपूजन याच महिन्यात होईल. सुमारे १६०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे काम मेट्रो कंपनी करणार आहे.

पर्वती विधानसभा मतदारसंघातील स्वारगेट हा वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग आहे. खासगी सार्वजनिक सहभागातून (पीपीपी मॉडेल) हा ट्रान्स्पोर्ट हब उभा केला जाईल. प्रकल्पासाठी २० एकर जागा आवश्‍यक आहे. पीएमपी, एसटी आणि मनपाची एकूण १७ एकर जागा ताब्यात आली आहे. विपश्‍यना केंद्राची ३ एकर जागा मिळविण्याचा प्रयत्न आहे. विपश्‍यना केंद्राची जागाही महापालिकेचीच असून, ती संबंधित संस्थेला भाडेतत्त्वावर दिली आहे. त्यांना पर्यायी जागा देण्यासंदर्भातही विचार सुरू आहे. केंद्राची जागा मिळाली नाही तरी प्रकल्पाचे काम केले जाऊ शकते. केंद्राची जागाही या भागातील वाहतूक वळविण्यासाठी उपयुक्त ठरू शकते, अशी माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्वारगेट येथे सध्या मेट्रो स्थानकाचे काम सुरू झाले आहे. त्याठिकाणी खोदाई सुरू असून, याच भागात ट्रान्स्पोर्ट हब उभे करण्याचे काम मेट्रो कंपनीला दिले आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तो महापालिका करू शकत नसल्याने ‘पीपीपी’ पद्धतीने केला जात आहे. याचे काम सुरू झाल्यानंतर साधारणपणे तीन वर्षांत हे काम पूर्ण होईल. याठिकाणी मेट्रो स्टेशन, एसटी आणि पीएमपी स्थानक, रिक्षा आणि खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या चार चाकी वाहनांसाठी स्थानक असेल. शॉपिंग मॉल, कमर्शिअल कॉम्प्लेक्‍स अशा सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

प्रकल्प अहवालाचे काम सुरू
स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गासाठी गंगाधाम ते शत्रुंजय मंदिर ते कात्रज, सातारा रस्ता ते बिबवेवाडी रस्ता ते अप्पर इंदिरानगर असे पर्याय आहेत. त्या संदर्भात प्रकल्प अहवाल तयार केला जात आहे. अप्पर इंदिरानगर येथे मेट्रोचे स्थानक उभारून तेथून बसने कात्रजपर्यंत सेवा देता येईल. अप्पर इंदिरानगर येथून पुरंदर तालुक्‍यातील विमानतळाशी मेट्रोला जोडणे शक्‍य होणार आहे. त्यामुळे या पर्यायाचा विचार केला जाऊ शकतो, अशी माहिती मिसाळ यांनी दिली. 

Web Title: The transport hubs will be metro