#TransportIssue पुण्यातील अपघातांची संख्या घटली

पांडुरंग सरोदे
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

वाहतूक नियोजनाबरोबरच पोलिस कर्मचारी अपघात नियंत्रण करण्यावर भर देत आहेत. वारंवार अपघात घडणाऱ्या ठिकाणी महापालिकेसह अन्य विभागांच्या मदतीने आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे अपघातांवर नियंत्रण येऊन जीवितहानीही कमी झाली आहे.
- पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा 

पुणे - रस्त्यांवरील अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांना आता यश येऊ लागले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऑक्‍टोबर महिन्यापर्यंत शहरातील अपघात २५ टक्‍क्‍यांनी कमी झाले असून, जीवितहानीदेखील २६ टक्‍क्‍यांनी घटली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी अपघातांतील मृतांची संख्या ५६ ने कमी झाली आहे.

पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी पुणे पोलिस दलाची सूत्रे स्वीकारल्यानंतर वाढते अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या. त्यानुसार पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक पोलिसांनी काम सुरू केले. प्रारंभी रस्त्यांवरील अपघात, त्यांची कारणे, सतत अपघात होण्याची ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) याबाबतची सविस्तर माहिती पालिका व रस्ते विकास महामंडळाला देऊन त्याबाबत उपाययोजनांसाठी पाठपुरावा केला. वाहतूक शाखेने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली.

महाविद्यालयांसह सार्वजनिक ठिकाणी वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली. यंदा फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक २५ अपघातांत २६ जणांचा मृत्यू झाला. एप्रिल व जून महिन्यात सर्वांत कमी अपघात व मृत्यू झाले. ऑक्‍टोबर २०१८मध्ये २६ अपघातांमध्ये २६ जणांना प्राण गमवावा लागला होता. ऑक्‍टोबर २०१९ मध्ये मात्र १४ अपघातांमध्ये १५ जणांचा प्राण गेला. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा या महिन्यात ११ जणांचे प्राण वाचले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transport Issue accident count less in pune