वाहतुकीचा पुणे पॅटर्न निर्माण करणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

पुणे - ‘शहरामध्ये रस्ते अपघाताचे प्रमाण या वर्षअखेरपर्यंत ५० टक्‍क्‍यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. ते साध्य करून वाहतूक शिस्तीचा पुणे पॅटर्न विकसित करत राज्यात आदर्श निर्माण करणार आहे,’’ असा विश्‍वास पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी व्यक्त केला.

पुणे - ‘शहरामध्ये रस्ते अपघाताचे प्रमाण या वर्षअखेरपर्यंत ५० टक्‍क्‍यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. ते साध्य करून वाहतूक शिस्तीचा पुणे पॅटर्न विकसित करत राज्यात आदर्श निर्माण करणार आहे,’’ असा विश्‍वास पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी व्यक्त केला.

भारतीय कला प्रसारिणी सभा व पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने वाहतूक नियमांबाबत जनजागृती करणाऱ्या चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. पोलिस उपायुक्त (वाहतूक शाखा) तेजस्वी सातपुते, सभेचे सचिव पुष्कराज पाठक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, महापालिका अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप आदी उपस्थित होते. कामाक्षी कोनापुरे, प्रतीक्षा भरते, प्रतीक भुरावडे, श्रेया जोशी, ओमकार कुंजीर या विद्यार्थ्यांचा सत्कार डॉ. व्यंकटेशम यांच्या हस्ते करण्यात आला. हे प्रदर्शन बुधवारपर्यंत (ता. १३) सर्वांसाठी खुले राहणार आहे.

डॉ. वेंकटेशम म्हणाले, ‘‘जानेवारी २०१८ आणि जानेवारी २०१९ या महिन्यांतील अपघातांचे प्रमाण ४४ टक्‍क्‍यांनी कमी झाले असून, येत्या काळात ते ५० टक्के करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), वाहतूक पोलिस आणि महापालिका मिळून काम करीत आहेत.’’ शहरामध्ये हेल्मेटसक्ती नव्हे, तर शिस्त असली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. राऊत म्हणाले, ‘‘वाहन चालवताना प्रत्येक चालक स्वतःला जगातील सर्वोत्तम चालक समजतो. मात्र वाहन चालवणे ही एक कला असून, ती आत्मसात करण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे चालकांनी स्वतःला सर्वोत्तम चालक समजू नये.’’ 

वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी चार ‘ई’ महत्त्वाचे आहेत. त्यात एज्युकेशन, इंजिनिअरिंग, एन्फोर्समेंट व इमर्जन्सी केअरचा समावेश आहे. एज्युकेशन आणि इमर्जन्सी केअर हे विषय अत्यंत महत्त्वपूर्ण हाताळणे गरजेचे आहे.
- तेजस्वी सातपुते, पोलिस उपायुक्त (वाहतूक शाखा)

Web Title: Transport Pune Pattern K. Venkatesham