पोलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

खेड- शिवापूर - पुणे- सातारा रस्त्यावर दर रविवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. मात्र, या रविवारी राजगड पोलिसांनी योग्य वाहतूक नियोजन केल्याने पुणे- सातारा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली नाही.  

खेड- शिवापूर - पुणे- सातारा रस्त्यावर दर रविवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. मात्र, या रविवारी राजगड पोलिसांनी योग्य वाहतूक नियोजन केल्याने पुणे- सातारा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली नाही.  

लग्नसमारंभ आणि सुटी यामुळे पुणे- सातारा रस्त्यावर रविवारी दिवसभर वाहनांची गर्दी होत असते. दुपारपर्यंत पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या जास्त होती. सायंकाळी पाचनंतर साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची गर्दी वाढली. पुण्याकडे येताना टोल नाका ओलांडल्यानंतर दर्गा फाट्यापासून ससेवाडी फाट्यापर्यंत रस्ता अरुंद आहे. त्यातच कोंढणपूर फाट्यावरून वळणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत होती. 

मात्र, राजगड पोलिसांनी सायंकाळी पाच वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत या वाहतुकीचे योग्य नियोजन केले. कोंढणपूर फाटा आणि दर्गा फाट्यावर वळणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा होत होता. याठिकाणी थांबून फौजदार राहुल वरोटे, पोलिस हवालदार संतोष तोडकर, नरेश येमूल या पोलिस कर्मचाऱ्यांनी बेशिस्तपणे वळणाऱ्या वाहनांना थांबवून वाहतूक सुरळीत केली. तसेच, बाग ते कोंढणपूर फाट्यादरम्यान विरुद्ध दिशेने होणारी वाहतूकही थांबवली. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी असली तरी वाहतूक सुरळीतपणे सुरू होती. 

रस्ता ओलांडण्यास पाच मिनिटे
रविवारी सायंकाळी पुणे- सातारा रस्त्यावर वाहनांची गर्दी होती. दर्गा फाटा, कोंढणपूर फाटा, वेळू फाटा आणि गोगलवाडी  फाट्यावर नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी सुमारे पाच ते दहा मिनिटे वेळ लागत होता.

Web Title: Transport of traffic due to police planning