नायजेरियन टोळ्यांसाठी सापळा

अनिल सावळे - @AnilSawale
बुधवार, 11 जानेवारी 2017

लुबाडणूक थांबविण्याकरिता पोलिसांकडून कंपन्यांना टिप्स

पुणे - कधी लाखोंची लॉटरी लागल्याचे आमिष; तर कधी डेबिट कार्डवरील क्रमांक विचारून फसवणूक... प्रत्येक वेळी वेगळी शक्‍कल लढवून नागरिकांना लुबाडणाऱ्या नायजेरियन टोळ्यांनी आता शहरातील उद्योजक, व्यावसायिकांना लक्ष्य केले आहे. त्यांनी गेल्या काही महिन्यांत १२ नामांकित कंपन्यांना चार कोटी रुपयांना लुबाडल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे अशी फसवणूक कशी टाळावी, याच्या टिप्स थेट कंपन्यांना देण्याची मोहीम सायबर पोलिसांनी हाती घेतली आहे.

लुबाडणूक थांबविण्याकरिता पोलिसांकडून कंपन्यांना टिप्स

पुणे - कधी लाखोंची लॉटरी लागल्याचे आमिष; तर कधी डेबिट कार्डवरील क्रमांक विचारून फसवणूक... प्रत्येक वेळी वेगळी शक्‍कल लढवून नागरिकांना लुबाडणाऱ्या नायजेरियन टोळ्यांनी आता शहरातील उद्योजक, व्यावसायिकांना लक्ष्य केले आहे. त्यांनी गेल्या काही महिन्यांत १२ नामांकित कंपन्यांना चार कोटी रुपयांना लुबाडल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे अशी फसवणूक कशी टाळावी, याच्या टिप्स थेट कंपन्यांना देण्याची मोहीम सायबर पोलिसांनी हाती घेतली आहे.

आर्थिक व्यवहारावर ‘वॉच’
फसवणूक झालेल्यांमध्ये हिंजवडी, पिंपरी, चाकण, एमआयडीसीसह इतर भागातील काही उद्योजकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या कंपन्यांना आर्थिक फटका बसल्यामुळे त्याची झळ कामगारांनाही सोसावी लागत आहे. नायजेरियन टोळ्यांकडून आंतरराष्ट्रीय व्यापार करणाऱ्या पुण्यातील काही कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारावर ‘वॉच’ ठेवला जात आहे.

अशी झाली फसवणूक
नायजेरियन टोळ्यांकडून कंपनीच्या नावातील स्पेलिंग बदलून साधर्म्य असलेले बनावट डोमेन तयार केले जाते. बनावट ई-मेल आयडी प्राप्त झाल्यानंतर कंपनीचा ई-मेल हॅक करून दोघांच्या व्यवहारांवर नजर ठेवली जाते. एखाद्या कंपनीने परदेशातून माल खरेदी केल्यानंतर त्याची रक्‍कम बॅंक खात्यात हस्तांतरित केली जाते. नेमका तोच ई-मेल हॅक करून ही नायजेरियन टोळी कंपनीच्या बॅंक खात्यात बदल झाल्याचा ई-मेल पाठवून स्वत:चा बॅंक खाते क्रमांक देतात. परदेशी कंपनीच्या ई-मेलवर विश्‍वास ठेवून येथील उद्योजकांनी पैसेही पाठविले; परंतु अद्याप पैसे मिळालेच नसल्याचा ई-मेल आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. अशा प्रकारे पुण्यातील १२ कंपन्यांनी आत्तापर्यंत चार कोटी रुपये नायजेरियन टोळ्यांच्या बॅंक खात्यात भरल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
 

आरोपींना पकडून आणण्यात अडथळे
सायबर गुन्हे शाखेने या गुन्ह्यांचा तपास करून आरोपी निश्‍चित केले आहेत. मात्र, त्यांना नायजेरियातून आणण्यात कायदेशीर परवानगी मिळविण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे नायजेरियन टोळ्या पुणेकरांची डोकेदुखी ठरत आहे.

कंपन्यांना केले सावध
सायबर गुन्हे शाखेने पुणे, पिंपरी, चाकण, हिंजवडी आणि एमआयडीसी परिसरातील शंभराहून अधिक कंपन्यांना खबरदारी घेण्याबाबत पत्र पाठविले आहे. परदेशातील कंपन्यांनाही अशा घटनांबाबत सूचित केले आहे. कंपन्यांनी आर्थिक व्यवहारांवर मॉनिटरिंग आणि सायबर सुरक्षिततेबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन
केले आहे.

सुरक्षिततेबाबत टिप्स 
ई-मेल आल्यानंतर मेल हेडर तपासावा
पैसे पाठविण्यापूर्वी संबंधित कंपनीशी संपर्क साधावा
अनोळखी लिंक उघडू नये
यूजर, पासवर्ड सतत बदलावा
ई-मेल हॅक होऊ नये, यासाठी संगणक सिस्टिममध्ये फायरवॉल, अँटिव्हायरसचा वापर करावा
नियमित सिक्‍युरिटी ऑडिट करून घ्यावे

पिंपरी येथील कायनेटिक टायझिन इलेक्‍ट्रिकल कंपनीच्या एम. के. माधवन यांची एक कोटी १८ लाख रुपयांची फसवणूक झाली. त्यांनी तैवान येथील कंपनीकडून इलेक्‍ट्रिक पार्टस आयात करण्यासाठी ऑर्डर दिली होती. मात्र, नायजेरियन टोळीने त्यांचा ई-मेल आयडी हॅक करून बॅंक खात्याचा बनावट क्रमांक मिळविला. माधवन यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याने बॅंक डिटेल्स दिले. त्यानुसार भांडारकर रस्त्यावरील एका बॅंकेच्या शाखेतून ही रक्‍कम पाठविण्यात आली. मात्र, काही दिवसांनंतर ही रक्‍कम दुसऱ्याच व्यक्‍तीच्या खात्यात जमा झाल्याचे लक्षात आले. 

ई-मेल आयडी हॅक करून हिंजवडी येथील एका कंपनीची एक कोटी १८ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. बंडगार्डन, समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीतही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. याबाबत सायबर गुन्हे शाखेकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

गेल्या दोन-तीन महिन्यांत अशा स्वरूपाच्या सायबर गुन्ह्यांत वाढ झाली आहे. गुन्ह्यावर प्रतिबंध घालण्यासाठी कंपन्यांनी स्वत:च्या आणि साधर्म्य असणाऱ्या संकेतस्थळ, ई-मेलवर नजर ठेवावी. बॅंक खात्यात बदल अथवा अन्य काही शंका आल्यास पैसे पाठविण्यापूर्वी कंपनीच्या अधिकृत व्यक्‍तीशी मोबाईलवर संवाद साधून खात्री करावी.
- सुनील पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर गुन्हे शाखा

Web Title: trap for naijerian gang