esakal | लय भारी! पुणे शहरात फिरा आता १० रुपयांत

बोलून बातमी शोधा

PMP-AC-Bus}

पुणे शहरात पीएमपीच्या वातानुकूलन (एसी) बसमधून प्रवाशांना १० रुपयांत प्रवासाची सुविधा देणारी योजना महापालिकेच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली आहे.

लय भारी! पुणे शहरात फिरा आता १० रुपयांत
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - शहरात पीएमपीच्या वातानुकूलन (एसी) बसमधून प्रवाशांना १० रुपयांत प्रवासाची सुविधा देणारी योजना महापालिकेच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात शहराच्या मध्यभागात तर, दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण शहरात ही योजना राबविणार आहे. मे महिन्यापासून या योजनेची अंमलबजावणी होईल.

डेक्कन ते पूलगेट, स्वारगेट ते पुणे स्टेशन, स्वारगेट- शिवाजीनगर, स्वारगेट- टिळक रस्ता- खजिना विहिर- अप्पा बळवंत चौक- पुणे स्टेशनमार्गे पूलगेट (वर्तुळाकार) या मार्गांवर दिवसभरासाठी मिडी बसमधून प्रवाशांना १० रुपयांत प्रवास करता येणार आहे. मे महिन्यात या योजनेची अंमलबजावणी होणार आहे. त्यासाठी ५० मिडी बस खरेदी करण्यासाठी स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यानंतर या योजनेचा विस्तार करणार आहे. त्यासाठी सुमारे ३०० मिडी बस खरेदी करणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘अटल’साठी ८५ कोटींची तरतूद 
शहराच्या विविध भागांत ५ रुपयांत पाच किलोमीटर प्रवास करण्यासाठी ‘अटल बससेवा’ सुरू केली आहे. या अंतर्गत पुणे स्टेशन, स्वारगेट, शिवाजीनगर, महापालिका भवन आणि पूलगेट आदी महत्त्वाच्या स्थानकांवरून सरासरी तीन ते सहा किलोमीटरच्या अंतरावरील नऊ मार्गांवर दर पाच मिनिटांनी या बस धावत आहेत. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी अर्थसंकल्पात ८५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

दर पाच मिनिटांना बस 
पीएमपीच्या ताफ्यात सध्या स्वःमालकीच्या १४७५, भाडेतत्त्‍वावरील सीएनजी बस ८०६, ई- बस १५० अशा २४३१ बस आहेत. हा ताफा ३२८१ पर्यंत वाढविण्याचे नियोजन स्थायी समितीने केले आहे. त्याअंतर्गत ५०० ई बस, ३५० मिडी बस लवकरच पीएमपीच्या ताफ्यात दाखल होतील. सेंट्रल इन्स्‍टिट्यूट ऑफ रोड ट्रान्स्पोर्टच्या निकषानुसार, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एकत्रित लोकसंख्येचा विचार करता पीएमपीच्या ताफ्यात ३ हजार ५०० बस आवश्यक आहेत. त्याची पूर्तता करण्याचा संकल्प स्थायी समितीने केला असून येत्या डिसेंबरअखेर पीएमपीच्या ताफ्यात ३२८१ बस होतील, असे नियोजन स्थायी समितीने केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संचलनातील तुटीसाठी ३०८ कोटी
पीएमपीच्या ताफ्यात नव्या बस वाढत असताना संचलनातील तुटीसाठी मोठ्या रकमेची तरतूद स्थायी समितीला करावी लागत आहे. आगामी आर्थिक वर्षासाठी पीएमपीला महापालिकेकडून ३७८ कोटी रुपये मिळणार आहेत. त्यातील ३०८ कोटी रुपये संचलनातील तुटीसाठी, पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाससाठी सात कोटी, अंध-अपंगांच्या पाससाठी नऊ कोटी ५० लाख, विविध सवलतीच्या पाससाठी तीन कोटी ५० लाख आणि नव्या बसच्या खरेदीसाठी ५० कोटी रुपयांच्या तरतुदीचा त्यात समावेश आहे. 

Edited By - Prashant Patil