अडथळ्यांचा सामना करत पुणे-सातारा रस्त्यावरील प्रवाशांचा प्रवास

महेंद्र शिंदे
शनिवार, 14 एप्रिल 2018

खेड-शिवापुर (पुणे) : ठिकठिकाणी रस्त्याच्या मधोमध थाटलेली दुकाने, रस्त्यावर अस्ताव्यस्त लावण्यात आलेले पोस्टर आणि बेशिस्तपणे रस्त्यावर उभी राहणारी अवजड वाहने. अशी अडथळ्यांची शर्यत पार करत पुणे-सातारा रस्त्यावर प्रवाशांना प्रवास करावा लागतो. पण 'सुखरूप आणि सुरक्षित प्रवास' असे बिरुद मिरवणाऱ्या महामार्ग पोलिसांना मात्र प्रवाशांची ही अडथळ्यांची शर्यत दिसत नाही. अपघाताला निमंत्रण ठरणाऱ्या रस्त्यावरील या अतिक्रमणांवर पोलिस कारवाई का करत नाहीत? असा सवाल नागरीक विचारत आहेत.

पुणे-सातारा रस्त्यावर शिंदेवाडी ते सारोळा दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा गेल्या अनेक वर्षांपासून अनेक टपऱ्या आणि दुकाने उभारण्यात आली आहेत. त्याठिकाणी थांबणाऱ्या प्रवाशांच्या वाहनांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तर रस्त्यावर हॉटेलचालक तसेच अन्य व्यावसायिकांनी जागा मिळेल तेथे लावलेल्या पोस्टरमधुन वाहन चालकांना रस्ता शोधावा लागतो, अशी परिस्थिती आहे. अनेक हॉटेलमध्ये येणारी वहाने रस्त्यावरच उभी राहतात. त्यामुळेही अनेकदा लहान-मोठे अपघात झाले आहेत. पुणे-सातारा रस्त्यावरील टपऱ्या, पोस्टर आणि उभ्या राहणाऱ्या अवजड वाहनांच्या या अडथळ्यांमुळे येथून जाताना प्रवाशांची मोठी गैरसोय होते आहे.

अशा परिस्थितीत महामार्ग पोलिस, स्थानिक पोलिस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पेट्रोलिंग पथक पुणे-सातारा रस्त्यावरील या अडथळ्यांकडे दुर्लक्ष का करत आहे? असा सवाल नागरीक विचारत आहेत. 

रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता महामार्ग पोलिसांनी घेणे आवश्यक आहे. मात्र 'सुखरूप आणि सुरक्षित प्रवास' असे बिरुद मिरवणारे महामार्ग पोलिस रस्त्यावरील या अडथळ्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. तर स्थानिक पोलिसही त्याकडे सोईस्करपणे कानाडोळा करत आहेत. 
 
याबाबत महामार्ग पोलिसांशी संपर्क साधला असता आम्ही या अनधिकृत रस्त्यावर उभ्या राहिलेल्या टपऱ्या, वाहने आणि फ्लेक्स लावणाऱ्यांना नोटीसा दिल्या आहेत. लवकरच स्थानिक पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाई करुन रस्त्यावरील ही अतिक्रमणे काढण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. तर लवकरच रस्त्यावर असलेली ही अतिक्रमणे काढण्यात येणार असल्याचे राजगड पोलिसांनी सांगितले.

Web Title: traveling between pune satar road is very problematic