भांडार अधिकारी निलंबित 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

पुणे - सुट्या भागांचा पुरवठा वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे आणि त्यातील अनियमिततेबद्दल पीएमपीमधील भांडार अधिकाऱ्याला (स्टोअर ऑफिसर) पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी निलंबित केले. 
वरिष्ठ अधिकाऱ्याबाबतही प्रशासनाने तडकाफडकी निर्णय घेतल्यामुळे पीएमपीमध्ये खळबळ उडाली आहे. 

पुणे - सुट्या भागांचा पुरवठा वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे आणि त्यातील अनियमिततेबद्दल पीएमपीमधील भांडार अधिकाऱ्याला (स्टोअर ऑफिसर) पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी निलंबित केले. 
वरिष्ठ अधिकाऱ्याबाबतही प्रशासनाने तडकाफडकी निर्णय घेतल्यामुळे पीएमपीमध्ये खळबळ उडाली आहे. 

पीएमपीच्या सुमारे 400 बस तातडीने दुरुस्त करण्यावर मुंढे यांनी भर दिला आहे. सुटे भाग वेळेवर उपलब्ध व्हावेत, त्यांचा पुरवठा आगारांना वेळेवर व्हावा, कार्यशाळेत ते वेळेवर उपलब्ध व्हावेत, सुट्या भागांचा दर्जा चांगला असावा, आदी सूचना मुंढे यांनी नुकतेच दिले आहेत. त्याची अंमलबजावणी काटेकोर करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्याचे उल्लंघन होत असल्याचे व त्यात अनियमितता असल्याचे दिसून आल्यावर मुंढे यांनी भांडार अधिकारी चंद्रशेखर कदम यांना निलंबित करण्याचा निर्णय शुक्रवारी सायंकाळी घेतला. कदम सुमारे दोन वर्षांपासून भांडार अधिकारी म्हणून काम करतात. सुट्या भागांची खरेदी करणे, त्यांचा दर्जा तपासणे आणि पीएमपीचे आगार, कार्यशाळा आदींना पुरवठा करणे त्यांची जबाबदारी होती. कामावर असताना झोपलेल्या 10 कर्मचाऱ्यांना, उशिरा रुजू झाल्यामुळे दोन वाहकांना नुकतेच निलंबित करण्यात आले आहे. 

71 जणांच्या बदल्या 
बस संख्येच्या प्रमाणात कर्मचारी उपलब्ध व्हावेत, म्हणून कार्यशाळांतील 71 कर्मचाऱ्यांच्या बदल्या शुक्रवारी करण्यात आल्या. त्यामुळे ज्या आगारांत बसच्या प्रमाणात कर्मचारी कमी आहेत, त्यांना तेथे नियुक्त करण्यात आले, तर ज्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे, त्यांना तेथून बदलण्यात आले. 

सुसूत्रीकरणासाठी समिती 
मार्गांच्या सुसूत्रीकरणासाठी मुंढे यांनी समिती नियुक्त केली आहे. या समितीच्या माध्यमातून मार्गावरील बसच्या फेऱ्या आणि प्रवासी संख्या यांचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर तोट्यातील मार्ग बंद करता येतील का, याचा आढावा घेऊन ही समिती मार्गांची संख्या निश्‍चित करणार आहे. 

"निलंबनाची थेट कारवाई नको' 
पीएमपीतील कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करण्यापूर्वी ताकीद देणे, कारणा दाखवा नोटीस देणे, चौकशी करणे आदी प्रक्रियेचा अवलंब करावा, अशी मागणी नगरसेवक महेश वाबळे यांनी केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी; परंतु तत्पूर्वी त्यांचेही म्हणणे ऐकून घ्यावे, असे त्यांनी पीएमपीच्या अध्यक्षांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निलंबनाच्या थेट कारवाईमुळे कर्मचाऱ्यांत अस्वस्थता निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Treasury officier suspended