झोपेच्या आजारांवरील उपचारासाठी "स्लीप लॅब' 

सलील उरुणकर 
शुक्रवार, 17 मार्च 2017

पुणे - बदलत्या जीवनशैलीमुळे वाढलेल्या झोपेच्या आजारांच्या प्रमाणाबरोबरच त्याच्या उपचारांसाठी असलेल्या "स्लीप लॅब'चे पेव राज्यात फुटले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये झोपेच्या आजारांविषयी नागरिकांमधील जनजागृती पाचपटीने वाढल्याचे निरीक्षणही वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदविले. 

पुणे - बदलत्या जीवनशैलीमुळे वाढलेल्या झोपेच्या आजारांच्या प्रमाणाबरोबरच त्याच्या उपचारांसाठी असलेल्या "स्लीप लॅब'चे पेव राज्यात फुटले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये झोपेच्या आजारांविषयी नागरिकांमधील जनजागृती पाचपटीने वाढल्याचे निरीक्षणही वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदविले. 

"स्लीप लॅब' कशासाठी? 
एखाद्याचे झोपेत मोठ्याने घोरणे हा घराघरातील बहुधा चेष्टेचा विषय असतो; मात्र त्याच्या दुष्परिणामांची माहिती आपण तितक्‍या गांभीर्याने घेत नाही. झोप व्यवस्थित न झाल्यास येणारा थकवा, होणारी चिडचिड यामुळे केवळ आपल्याला स्वतःलाच नव्हे तर आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांनाही होतो. वैयक्तिक जीवनासह समाज जीवनातही त्याचा प्रभाव पडत असल्यामुळे झोपेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सध्याच्या सुपरफास्ट जगामध्ये सगळ्याच गोष्टी "4जी'च्या स्पीडने अनुभवण्याची आपली इच्छा असली तरी पुरेशी झोप घेण्यासाठी कुठेतरी "स्पीड-ब्रेकर' असायलाच हवा. दैनंदिन ताणतणावातून मुक्तता करणारा हा स्पीड ब्रेकर म्हणजे पुरेशी व शांत झोप मिळणे. 

अपुऱ्या झोपेमुळे होणाऱ्या आजारांमध्ये निद्रानाश, नपुंसकत्व, मधुमेह, लठ्ठपणा, ऑबस्ट्रक्‍टिव्ह स्लीप एपनिया आणि रेस्टलेस लेग सिंड्रोम यांचा समावेश होतो. आपल्याला काही आजार झाल्यानंतर आपण डॉक्‍टरांकडे धाव घेतो. आजाराचे योग्य निदान करण्यासाठी डॉक्‍टर बहुधा रक्त, लघवी किंवा अन्य प्रकारच्या चाचण्या करायला सांगतात. त्याचधर्तीवर झोपेशी निगडित आजारांचे निदान करण्यासाठी "स्लीप लॅब' ही संकल्पना राबविण्यात येते. 

काय असते "स्लीप लॅब'मध्ये? 
झोपेशी संबंधित आजारांचे निदान करण्यासाठी रुग्णांना विविध प्रश्न विचारले जातात तसेच चाचण्या केल्या जातात. त्यासाठी स्लीप लॅबमध्ये योग्य वातावरण आणि उपकरणांची जोड दिलेली असते. रुग्णांना स्लीप डायरी लिहिण्यास सांगितले जाते जेणेकरून त्यांच्या झोपेच्या वेळा व पद्धतीमध्ये नेमके काय व कसे बदल होत आहेत याची नोंद करता येते. झोपेच्या पॅटर्नचा अभ्यास केल्यानंतर रुग्णांना इन-लॅब टेस्टिंगसाठी दाखल केले जाते. त्यामध्ये एक संपूर्ण रात्र संबंधित रुग्ण एका खोलीत झोपतो व त्याच्या शरीराला काही उपकरणे जोडली जातात. मेंदू, हृदय आणि श्वसनक्रियेशी संबंधित काही निरीक्षणे नोंदविण्यासाठी ही उपकरणे लावलेली असतात. 

"ऑब्स्ट्रक्‍टिव्ह स्लीप ऍपनिया'चा त्रास 
झोपेमध्ये असताना दहा सेकंद किंवा त्यापेक्षा अधिक वेळेसाठी श्वसनक्रिया बंद होण्याचा आजार म्हणजे "ऑबस्ट्रकटिव्ह स्लीप ऍपनिया'. श्वसनक्रिया बंद झाल्यानंतर काही क्षणातच आपला मेंदू आपल्याला जाग आणतो आणि घोरण्याच्या आवाजासह पुन्हा आपली श्वसनक्रिया सुरू होते. ऑबस्ट्रक्‍टिव्ह स्लीप ऍपनियाने त्रस्त असलेल्या लोकांना रात्रभराच्या झोपेच्या कालावधीत असे प्रसंग वारंवार येतात. ऑबस्ट्रक्‍टिव्ह स्लीप एपनिया आजार असलेल्या व्यक्तींना एका तासात दहा ते बारा वेळा तसेच एका रात्रीच्या कालावधीत शेकडोवेळा श्वसनक्रिया काही सेकंद बंद होण्यासारखा त्रास होतो. या आजारामुळे वाहन चालविताना झोप येऊन अपघात होण्याची शक्‍यता सातपटीने वाढते तर हृदयविकाराचा झटका येण्याच्या शक्‍यतेत तिप्पट वाढ होते. या आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींसाठी ही स्लीप लॅब टेस्ट अत्यंत उपयुक्त ठरते. अशाप्रकारे झोपेशी संबंधित आजाराचे निदान झाल्यानंतर प्रत्येक रुग्णाला साजेशी उपचार पद्धती निश्‍चित करून त्याप्रमाणे उपचार केले जातात. 

तज्ज्ञ म्हणतात... 
"इंडियन असोसिएशन ऑफ सर्जन्स फॉर स्लीप ऍपनिया'च्या सदस्य डॉ. कविता चौधरी म्हणाल्या, ""पुण्या-मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये आणि विशेषतः मध्यम व मोठ्या रुग्णालयांमध्ये "स्लीप लॅब' सुविधा ही अत्यावश्‍यक झाली आहे. नागरिकांमध्ये झोपेच्या आजारांविषयीची जनजागृती पाचपटीने वाढल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र तरीही परिस्थिती अशी आहे की झोपेच्या आजारांनी त्रस्त असलेल्या एकूण लोकांपैकी फक्त एक तृतीयांश लोक डॉक्‍टरांकडे उपचारासाठी येत आहेत.'' 

"उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांपैकी तब्बल 60 टक्के रुग्ण हे ऑबस्ट्रक्‍टिव्ह स्लीप ऍपनियाने ग्रस्त असतात. आजाराच्या प्राथमिक टप्प्यातील बहुतांश रुग्णांना त्यांच्या घरीच "स्लीप स्टडी' करून उपचार घेणे शक्‍य असते. प्रगत टप्प्यातील रुग्णांना "स्लीप लॅब'मध्ये आणण्याची आवश्‍यकता असते,'' असेही त्यांनी सांगितले.

Web Title: For the treatment of diseases of sleep sleep Lab