रात्रीत होत्याचे नव्हते झाले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

पुणे - अंगावरचे कपडे सोडले, तर आता आमच्याकडे काही नाही... पोटाची खळगी भरायला ५० वर्षांपूर्वी जसं आलो होतो, तशीच आमची आज अवस्था आहे... एका रात्रीत सर्व होत्याचे नव्हते झाले...

त्या दिवशी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला. रात्रीत पाण्याची पातळी वेगाने वाढली. घरातील कोणती वस्तू घ्यायची आणि कोणती ठेवायची, याचा विचार करायलाही पावसाने उसंत दिली नाही. उगवत्या सूर्याबरोबर हेलिकॉप्टर आले. आम्हाला उचलले आणि सुरक्षित ठिकाणी सोडले. आता अंगावरच्या कपड्याशिवाय आमच्याकडे काही नाही, केरळमध्ये कामासाठी स्थलांतरित झालेल्या मराठी माणसांनी ‘सकाळ’शी बोलताना ही भावना व्यक्त केली.

दोन पिढ्यांपूर्वी आम्ही पोटाची खळगी भरायला महाराष्ट्रातून केरळमध्ये आलो. सोलापूर, सातारा परिसरातील आम्ही काही जण एर्नाकुलम्‌ जिल्ह्यातील अलुवा तालुक्‍यात एकत्र राहात होतो. गेल्या पन्नास-पंचावन्न वर्षांमध्ये पोटाला चिमटा घेऊन जमवलेली काडीन्‌ काडी ठेवून हेलिकॉप्टरमध्ये बसलो... 

या मराठी माणसांना ठेवलेल्या सुरक्षित ठिकाणी उपचार करण्यासाठी ससून रुग्णालयाचे वैद्यकीय पथक पोचले. मराठी भाषा ऐकून आपल्या मातीची आठवण झाल्याची भावना केरळमध्ये स्थलांतरित मराठी लोकांनी व्यक्त केली. 

ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन भारती यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथक केरळमधील पूरग्रस्त रुग्णांवर उपचार करीत आहे. त्याबद्दल बोलताना डॉ. भारती म्हणाले, ‘‘केरळमधील पूरस्थिती आता नियंत्रणात आहे. पुराचे पाणी कमी होत आहे. पण, येथील नागरिक अजूनही शाळा, महाविद्यालय, मंदिर, चर्च या ठिकाणी राहात आहे. पुरामुळे नागरिकांचे खाण्या-पिण्याचे हाल झाले आहेत. स्वच्छता नसल्याने त्वचा रोग झाले आहेत. ताप, जुलाब होत आहे. तसेच, जलजन्य आजारांचा धोका असल्याने त्याबाबतची काळजी घेतली जात आहे. रोज ५०० ते ७०० रुग्णांवर उपचार करून त्यांना औषधोपचार करण्यात येत आहे.’’

Web Title: Treatment of flood patients with Sassoon Hospital in Kerala