वृक्षतोडीस अंशतः टप्प्याटप्प्याने परवानगी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

पुणे - शहरातील विकासकामांसाठी अडथळा ठरणारे वृक्ष सरसकट न तोडता प्रत्यक्ष पाहणीनंतर; तर धोकादायक आणि नागरिकांनी मागणी केलेल्या वृक्षतोडीच्या प्रस्तावांना टप्प्याटप्प्याने मंजुरी देण्याचा निर्णय वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत बुधवारी झाला.

पुणे - शहरातील विकासकामांसाठी अडथळा ठरणारे वृक्ष सरसकट न तोडता प्रत्यक्ष पाहणीनंतर; तर धोकादायक आणि नागरिकांनी मागणी केलेल्या वृक्षतोडीच्या प्रस्तावांना टप्प्याटप्प्याने मंजुरी देण्याचा निर्णय वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत बुधवारी झाला.

लोहगाव विमानतळाकडे जाणाऱ्या टाटा गार्डन ते फाइव्ह नाइन चौक या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी डाव्या बाजूची झाडे काढण्यास प्राधिकरणाने मान्यता दिली. शिवाजीनगर ते ब्रेमन चौक या रस्त्यावरील बीआरटी मार्गासाठी वृक्ष तोडण्याचा निर्णय प्रत्यक्ष पाहणीनंतर घेण्यात येईल.
वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीसमोर वृक्षतोडीसंदर्भात 1542 प्रकरणे मांडण्यात आली होती. रस्त्यांच्या कामासाठी, बांधकामासाठी; तसेच धोकादायक वृक्ष काढण्याचे प्रस्ताव समितीसमोर मांडण्यात आले होते. त्यामध्ये 595 झाडे पूर्णपणे काढून टाकावीत, 947 झाडांचे पुनर्रोपण करण्यात यावे, असे प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीपुढे मांडण्यात आले होते. 246 वृक्ष तोडण्यास परवानगी देऊ नये, असा अभिप्राय प्राधिकरणापुढे ठेवण्यात आला होता. नगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रुंदीकरण होणार आहे. तेथील झाडांच्या बाजूने दुभाजक उभारता येईल का, याची पाहणी करून त्याबाबत निर्णय घ्यावा, असे आवाहन प्राधिकरणाच्या सदस्यांनी केले. त्याला प्रशासनाने मंजुरी दिली; तसेच धोकादायक झालेले आणि नागरिक, संस्थांनी मागणी केलेले 325 वृक्ष तोडण्यास या वेळी परवानगी देण्यात आली. त्यातही नारळाच्या झाडांची पाहणी करून निर्णय घेऊ, असे सहमतीने ठरले.

शिवाजीनगर ते ब्रेमन चौक हा बीआरटी मार्ग विकसित करण्यासाठी वृक्षतोडीचा प्रस्ताव समितीसमोर मांडण्यात आला होता. मात्र शिवाजीनगर ते पुणे विद्यापीठ चौकापर्यंतची झाडे तोडण्याच्या प्रस्तावावर पाहणीनंतर निर्णय घेण्याचे ठरले. शहरात कोठेही सरसकट वृक्षतोड होणार नाही; परंतु नागरिकांचीही अडचण होणार नाही, हे बघून वृक्षतोडीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी स्पष्ट केले.
वृक्ष तोडल्यानंतर त्या बदल्यात तीन वृक्ष लावून ते जोपासण्याचे बंधन घालण्यात येते. त्यासाठी विकसकांना एका झाडामागे दहा हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागते. वृक्षाची जोपासना केल्याचे दाखविल्यानंतर त्यांना अनामत रक्कम परत दिली जाते. मात्र अनेक विकसकांनी अनामत रक्कम परत नेलेली नाही. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.

पुनर्रोपणावर अधिक लक्ष
वृक्षांच्या पुनर्रोपणाकडे उद्यान विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे प्राधिकरणाच्या सदस्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर सुमारे एक कोटी रुपये खर्च करून त्यासाठी आधुनिक यंत्रसामग्री घेणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले; तसेच गेल्या आठ वर्षांत उद्यान विभागामार्फत झालेली वृक्षलागवड आणि पुनर्रोपण झालेल्या झाडांच्या माहितीचा अहवाल येत्या आठ दिवसांत देण्यात येईल, असे प्रशासनाने नमूद केले. दरम्यान, वृक्षांची सरसकट तोड न करता प्रत्यक्ष पाहणी करून निर्णय घ्यावा, त्यात स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनाही सहभागी करून घ्यावे, असे आवाहन वृक्षप्रेमी नंदकुमार गोसावी, वैशाली पाटकर, विनोद जैन, हेमा चारी यांनी आयुक्तांना केले; तसेच आयुक्तांनी वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकांना नियमितपणे उपस्थिती लावावी, अशीही मागणी त्यांनी केली.

Web Title: tree cutting in phases