झाडांचा रेल्वे पुलाला धोका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

पिंपरी - हॅरिस पुलाजवळील रेल्वे पुलालगत असणाऱ्या भिंतीमध्ये अनेक ठिकाणी वडाची झाडे फुटली आहेत, त्यामुळे शंभर वर्षे जुन्या असणाऱ्या या पुलाचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. रेल्वे प्रशासनाने त्याची तत्काळ दखल न घेतल्यास भविष्यात त्याचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. 

पिंपरी - हॅरिस पुलाजवळील रेल्वे पुलालगत असणाऱ्या भिंतीमध्ये अनेक ठिकाणी वडाची झाडे फुटली आहेत, त्यामुळे शंभर वर्षे जुन्या असणाऱ्या या पुलाचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. रेल्वे प्रशासनाने त्याची तत्काळ दखल न घेतल्यास भविष्यात त्याचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. 

पुणे-मुंबईदरम्यान ये-जा करणाऱ्या रेल्वेगाड्या, पुणे-लोणावळा मार्गावरील लोकलगाड्या याच मार्गावरून ये-जा करतात. या पुलावरून दिवसरात्र रेल्वे वाहतूक सुरू असते. वडाच्या झाडांच्या मुळ्या पुलालगतच्या भिंतीतून आत गेल्या आहेत. अनेक ठिकाणी अशी झाडे आली असल्याने या पुलाला त्याचा फटका बसू शकतो. पुणे ते मुंबईदरम्यानच्या लोहमार्गादरम्यान कासारवाडीतील शंकरवाडीजवळ, आकुर्डीमध्ये रेल्वेचे पूल आहेत. या पुलांची सातत्याने देखभाल करण्याची गरज आहे.  

दरम्यान, वर्षभरापूर्वी प्रशासनाने रेल्वे पुलाला धोका पोचू नये, म्हणून या पुलाचे ग्राउटिंग केले होते. तरी देखील पुलालगतच्या भिंतीमध्ये झाडे फुटली आहेत.  कासारवाडीजवळील शंकरवाडी परिसर आणि आकुर्डी स्टेशनच्या पुढे असणाऱ्या रेल्वे पुलालगतच्या भिंतीमध्ये झाडांची मुळे घुसली आहेत. आम्ही पुलाची नियमित देखभाल करतो, असा दावा रेल्वे प्रशासन करते. परंतु वस्तुस्थिती वेगळी असल्याचे या झाडांमुळे स्पष्ट होत आहे.

रेल्वे प्रशासन म्हणते
पुणे ते मुंबईदरम्यानच्या लोहमार्गावर असणाऱ्या सर्व पुलांची वर्षातून तीन ते चार वेळा देखभाल करण्यात येते. रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागातील अधिकारी या पुलांची प्रत्यक्ष पाहणी करून तिथल्या देखभालीची पाहणी करतात. पुलाची देखभाल चार पातळ्यांवर करण्यात येते. त्यामुळे पुलावर कुठे त्रुटी आढळली, की तत्काळ त्याची दुरुस्ती करण्यात येते. प्रवाशांच्या सुरक्षेला रेल्वे सर्वाधिक प्राधान्य देत असल्याने नियमित देखभाल-दुरुस्ती होते.

हॅरिस पुलाजवळील रेल्वे पुलाच्या भितींमधील वडाची झाडे मागील वर्षी काढली होती. नव्याने आलेली झाडे काढण्यासाठी त्या ठिकाणी केमिकल प्रक्रिया करण्याचे नियोजन आहे. ते केल्याने हा प्रश्‍न कायमचा बंद होईल. रेल्वे प्रशासनाकडून लवकरच कार्यवाही करण्यात येईल. 
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग 

हॅरिस पुलालगत असणाऱ्या रेल्वे पुलालगतच्या भिंतीत अनेक ठिकाणी वडाची झाडे वाढली आहेत. बऱ्याच दिवसांपासून हे चित्र कायम आहे. पुलाच्या सुरक्षेचा विचार करून रेल्वे प्रशासनाने ही झाडे काढण्याची आवश्‍यकता आहे. 
- दिनेश मराठे, नागरिक

Web Title: tree danger for railway bridge