राज्यात झाडांचे फक्त उत्सवच! - बाबासाहेब पुरंदरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

अमेझॉनमधील वणव्यामुळे होणाऱ्या फार मोठ्या जैवविविधतेच्या हानीची खंत आहेच; पण महाराष्ट्रातील डोंगरचे डोंगर उजाड झालेले दिसतात. ते आपण हिरवे करू शकू का, हा प्रश्न आहे. झाडे हवीत, ती टिकावीत. मात्र, झाडांचे फक्त उत्सवच साजरे केले जातात, अशी खंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली.

पुणे - अमेझॉनमधील वणव्यामुळे होणाऱ्या फार मोठ्या जैवविविधतेच्या हानीची खंत आहेच; पण महाराष्ट्रातील डोंगरचे डोंगर उजाड झालेले दिसतात. ते आपण हिरवे करू शकू का, हा प्रश्न आहे. झाडे हवीत, ती टिकावीत. मात्र, झाडांचे फक्त उत्सवच साजरे केले जातात, अशी खंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली.

डॉ. संदीप श्रोत्री यांनी लिहिलेल्या "मनूचे अरण्य' (ऍमेझॉनच्या खोऱ्यातील जंगल भटकंती) या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्या हस्ते आज सायंकाळी करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. "मसाप'चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी व राजहंस प्रकाशनचे प्रमुख संपादक डॉ. सदानंद बोरसे उपस्थित होते.

ऍमेझॉनच्या जंगलात सध्या धुमसणाऱ्या वणव्याच्या पार्श्वभूमीवर या पुस्तकातून समजणाऱ्या जैवविविधतेचे महत्त्व आपल्याला अधिक पटू शकेल, असे मत मिलिंद गुणाजी यांनी व्यक्त केले.

पेरू देशातील मनू नदी परिसरातील, ऍमेझॉनच्या जंगलातील भटकंतीत दिसलेले वन्यजीवन स्लाइडच्या माध्यमातून दाखवत डॉ. श्रोत्री यांनी आपल्या या पुस्तकाचे अंतरंग उलगडून दाखविले. डॉ. बोरसे यांनी संपादकीय अनुभव सांगितले. जोशी म्हणाले की, मराठी साहित्य बदलते आहे. जंगल वाचणे व ऐकणे या पुस्तकातून अनुभवायला मिळते.

लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था व राजहंस प्रकाशन यांच्यातर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. लोकमंगलचे अध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी प्रास्ताविक केले. पर्यावरण अभ्यासक दीपक मोडक यांनी मनोगत व्यक्त केले. अभय देवरे यांनी सूत्रसंचालन केले. स्वाती श्रोत्री यांनी आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tree Festival in state babasaheb purandare