एक मित्र एक वृक्षची प्रेमाचे झाड संकल्पना

रमेश वत्रे
सोमवार, 14 मे 2018

केडगाव मधील किराणा व्यापारी प्रशांत मुथा यांनी त्यांची आई मंगलबाई मुथा यांच्या स्मरणार्थ दोन वर्षापुर्वी आपल्या मित्रांना एकत्र करून त्यांच्या वाढदिवसाला 'एक मित्र एक वृक्ष' ही संकल्पना राबवली. या संकल्पनेतून कोणतीही शासकीय मदत न घेता गेल्या दोन वर्षात ट्री गार्ड व पाण्याच्या व्यवस्थेसह सुमारे आठशे झाडे लावली गेली.

केडगाव : केडगाव ( ता. दौंड )  येथे एक मित्र एक वृक्ष या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वाढदिवसाला वृक्ष लावण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबविल्यानंतर आता 'प्रेमाचे झाड' ही संकल्पना यंदाच्या पावसाळ्यात राबविण्यात येणार आहे. या संकल्पनेचा प्रारंभ काल मातृत्वदिनापासून करण्यात आला.

केडगाव मधील किराणा व्यापारी प्रशांत मुथा यांनी त्यांची आई मंगलबाई मुथा यांच्या स्मरणार्थ दोन वर्षापुर्वी आपल्या मित्रांना एकत्र करून त्यांच्या वाढदिवसाला 'एक मित्र एक वृक्ष' ही संकल्पना राबवली. या संकल्पनेतून कोणतीही शासकीय मदत न घेता गेल्या दोन वर्षात ट्री गार्ड व पाण्याच्या व्यवस्थेसह सुमारे आठशे झाडे लावली गेली. यातील 99 टक्के झाडे आज सुस्थितीत आहेत. ही झाडे लावल्यानंतर त्या झाडांना पाणी देण्याची व्यवस्था संस्थेच्या माध्यमातून केली जात आहे. केडगाव परिसरातील सार्वजनिक ठिकाणी या झाडांची लागवड करण्यात आली आहे. रंजना गावडे यांच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून त्यांचा मुलगा दादा गावडे यांनी केडगावातील दशक्रिया घाटावर ट्री गार्डसह सहा झाडे काल लावून उपक्रमाची सुरवात करण्यात आली.   

प्रेमाचे झाड या संकल्पनेबाबत प्रशांत मुथा म्हणाले की, आपल्या कुटुंबातील किंवा परिसरातील आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो उदाहरणार्थ आई, वडील, मुलगा, पत्नी, मित्र यांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून झाडे लावण्यात येणार आहे. संबंधित व्यक्तिने फक्त ट्री गार्ड द्यायचे आहे. पाणी आणि झाडाची व्यवस्था 'एक मित्र' चे सदस्य करणार आहेत. प्रेमाचे झाड या संकल्पनेसाठी सोरतापवाडीचे सरपंच आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हा युवक अध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी 100 झाडे देण्याचे या वेळी आश्‍वासन दिले तर दौंड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश वत्रे यांनी त्यांची आई बनुबाई वत्रे यांच्या स्मरणार्थ 25 झाडे, लक्ष्मीबाई कचरे यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा व वरवंडचे सरपंच संतोष कचरे यांनी या उपक्रमासाठी 50 झाडे देणार असल्याचे यावेळी जाहिर केले. जवाहरलाल विद्यालयाचे प्राचार्य निजाम शेख, डॅा. श्रीवल्लभ अवचट यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.  

Web Title: tree plantation