रस्तारुंदीकरणात काढलेल्या वटवृक्षाचे यशस्वी पुर्नरोपण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

रस्तारुंदीकरणात जाणा-या वडाच्या झाडांचे पुर्नरोपण होऊ शकते हेच या प्रयोगाने पुन्हा एकदा सिध्द केले आहे. भविष्यात झाडांचे पुर्नरोपण करुन त्यांची नव्याने वाढ होण्यासाठी बारामतीचा हा प्रयोग मार्गदर्शक ठरणार आहे. 

बारामती : रस्तारुंदीकरणात वैभवशाली वारसा सांगणाऱ्या वटवृक्षाची तोड झाली तरी त्या वटवृक्षाचे पुर्नरोपण करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आणि हा वटवृक्ष आता पुन्हा त्याच दिमाखात बहरु लागला आहे. 

बारामती भिगवण रस्त्यावर सेवा रस्ता करताना म.ए.सो. विद्यालयाच्या आवारातील जुना वटवृक्ष काढून टाकण्याचा निर्णय झाला. पर्यावरणप्रेमींनी या बाबत नापसंती व्यक्त केली होती, मात्र रस्ताही गरजेचा असल्याने अखेर हा वृक्ष काढून टाकला गेला. 

बारामतीच्या इतिहासाचा एक साक्षीदार असलेल्या हा वटवृक्षाचे पुर्नरोपण व्हावे अशी इच्छा एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची होती. त्यांच्या प्रयत्नातून गटनेते सचिन सातव, नगरसेवक सत्यव्रत काळे यांनी पुढाकार घेत मेहनतीने या वटवृक्षाचे खोड एमआयडीसीतील वनविभागाच्या कार्यालयानजिक नेऊन पुर्नरोपण केले. ऑगस्ट 2018 मध्ये हे पुर्नरोपण केले गेले. 

आज सात महिन्यांच्या कालावधीत या वटवृक्षाने पुन्हा बाळसे धरण्यास प्रारंभ केला असून हे वडाचे झाड हिरव्यागार पालवीने बहरून गेले आहे. वनविभागानेही या झाडाची उत्तम देखभाल केलेली असल्याने या झाडाचे पुर्नरोपण यशस्वी झाले. बारामतीच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेले हे झाड आता पुन्हा नव्या जोमाने आकाशाकडे झेपावू लागले आहे. 

रस्तारुंदीकरणात जाणा-या वडाच्या झाडांचे पुर्नरोपण होऊ शकते हेच या प्रयोगाने पुन्हा एकदा सिध्द केले आहे. भविष्यात झाडांचे पुर्नरोपण करुन त्यांची नव्याने वाढ होण्यासाठी बारामतीचा हा प्रयोग मार्गदर्शक ठरणार आहे. 

Web Title: tree plantation in Baramati