एक झाड चौदा लाखांचे!

Pune Municipal
Pune Municipal

पुणे - पुणेकरांसाठी पुरेशी उद्याने उभारताना त्यातील झाडांच्या नावाखाली लाखो रुपये उकळण्याचा डाव महापालिकेतील अधिकाऱ्यांनी रचला आहे. सॅलिबसरी पार्क परिसरातील एका उद्यानासाठी तब्बल १४ लाख रुपये किमतीचे एक झाड खरेदी करण्यात येणार आहे. या झाडाची वाहतूक आणि त्याचे रोपण, याचा खर्च गृहीत धरून, त्याची किंमत १८ लाख रुपयांपर्यंत असेल. अशी ४ ते १४ लाख रुपये किमतीची ६५ झाडे महापालिका खरेदी करणार आहे.

विशेष म्हणजे या झाडांच्या किमती ठेकेदारानेच ठरविल्या आहेत. महापालिकेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अशा प्रकारची निविदा काढली आहे. 

नियोजित उद्यानासाठी केवळ ५० लाखांचीच तरतूद आहे, तरीही त्यातील झाडांसाठी मात्र अडीच कोटी खर्च करण्याचा उद्योग उद्यान खाते करीत आहे. या झाडांच्या किमतीचे दरपत्रक ठेकेदारांकडून मागविल्याने तो आकडा पाच कोटींपर्यंतही जाण्याचा अंदाज आहे. महापालिकेच्या उद्यान खात्याकडे तज्ज्ञ अधिकारी असतानाही झाडे खरेदीसाठी ठेकेदार नेमून, त्यांच्यामार्फत आपले खिसे फुगविण्याचा अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे. 

जलपर्णीची बनावट निविदा उघडकीस येऊन पंधरा दिवसही झाले नाहीत, तोच महापालिकेने आता पुन्हा झाड खरेदीसाठी वादग्रस्त निविदा काढल्याने महापालिकेच्या कारभाराबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

सॅलिसबरी पार्कमधील साडेतीन एकरांतील मोकळ्या जागेत टोपरी उद्यान विकसित करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. त्यात काही आकर्षक परदेशी झाडे लावण्यात येणार आहेत. 

उद्यान विभागाने ‘बी २’ पद्धतीने निविदा मागविल्या आहेत. म्हणजे ठेकेदारांनी संबंधित झाडांची किंमत ठरवून, त्याची निविदा महापालिकेकडे द्यायची आहे. त्यात ही झाडे पुरविणाऱ्या ठेकेदारांनीच वर्षभर देखभाल करावयाची आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील अडीच कोटींचे झाड खरेदीचे काम ठरावीक ठेकेदारालाच मिळाल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले.

खातेप्रमुखांचे उद्योग 
उद्यान विभागाने झाडे खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याची कोणतीही कल्पना महापालिकेतील अधिकाऱ्यांना नाही. निविदा काढायच्या, त्यात आपलेच ठेकेदार घुसवायचे, हे प्रकार महापालिकेतील खातेप्रमुख करीत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. 

नवी उद्याने ही विशिष्ट ‘थीम’वर विकसित करण्यात येतात. त्यानुसार टोपरी उद्यानासाठी ही झाडे घेतली जाणार असून, त्यातील एका झाडाची किंमत १४ लाख आहे. त्यासाठी ठेकेदारांकडून दर मागविले आहेत. निविदा अंतिम टप्प्यात आहे. 
- अशोक घोरपडे, प्रमुख, उद्यान विभाग, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com