लोखंडी जाळ्यात अडकलेली झाडे मुक्ततेसाठी निविदेच्या प्रतिक्षेत

रमेश मोरे
बुधवार, 20 जून 2018

'सकाळ' मधुन १ जुनच्या अंकात या शिर्षकाखाली सचित्र बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र वृक्ष संवर्धन विभागाकडुन निविदा काढुन झाडांना धोकादायक ठरणाऱ्या लोखंडी जाळ्या काढण्यासाठी निविदा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.

जुनी सांगवी - जुनी सांगवी परिसर व प्रभागातील पर्यावरण संतुलन राखण्यासाठी विविध उपक्रमांतर्गत गेली तीन चार वर्षापासुन रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेली झाडे आता मोठी झाली असुन गेली कित्येक दिवसांपासुन झाडे लहान असताना लावलेल्या लोखंडी जाळ्यात अडकली आहेत.

काही झाडांनी लोखंडी जाळ्या स्वत:त सामावून घेतल्याचे चित्र सांगवी परिसरातील मुळानदी किनारा रस्ता, मधुबन सोसायटी परिसर, वेताळ महाराज उद्यान रस्ता, प्रियदर्शनीनगर, ममतानगर आदी ठिकाणी दिसून येतात. मात्र महापालिकेच्या संबंधित रस्ते वृक्ष संवर्धन विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याने पर्यावरणप्रेमी व नागरीकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

याबाबत 'सकाळ' मधुन १ जुनच्या अंकात या शिर्षकाखाली सचित्र बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र वृक्ष संवर्धन विभागाकडुन निविदा काढुन झाडांना धोकादायक ठरणाऱ्या लोखंडी जाळ्या काढण्यासाठी निविदा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. वीस दिवस उलटुनही या कामाला सुरूवात न झाल्याने लोखंडी जाळ्यात अडकलेली झाडे पालिकेच्या निविदा प्रक्रियेत अडकून मुक्ततेच्या प्रतिक्षेत आहेत. सांगवी अंतर्गत व परिसरात गेली तीन चार वर्षापुर्वी रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेली झाडे आता मोठी झाली आहेत. लहान रोपटी लावताना या रोपांच्या संरक्षणासाठी पालिकेकडुन रोपाभोवती लावण्यात आलेल्या जाळ्या सद्यस्थितीत झाडांच्या मुळावर उठल्या आहेत. अनेक झाडे या लोखंडी जाळ्यांच्या कैदेत अडकली आहेत. असे असताना महापालिका प्रशासन व संबंधित विभाग वृक्ष संवर्धनासाठी किती तत्पर आहे याची प्रचिती येते. 

मुळा नदी किनारा रस्त्यावर लावलेली झाडे लोखंडी जाळ्यात अडकली आहेत.मात्र जाळ्या काढण्यासाठी संबंधित विभागाचा हलगर्जीपणा बघुन आश्चर्य वाटते - संजय गायकवाड, नागरीक

येथील मधुबन सोसायटी अंतर्गत बरीचशी झाडे लोखंडी जाळ्यात अडकलेली आहेत. पर्यावरणदिन साजरा करण्यापलिकडे कुणालाही याचे गांभीर्य नाही. - गणेश निवृत्ती ढोरे, अध्यक्ष मधुबन मित्र मंडळ

संबंधित विभागाला झाडांभोवतीच्या लोखंडी जाळ्या तात्काळ काढण्याबाबत सुचना दिल्या आहेत.येत्या दोन तीन दिवसात जाळ्या काढण्याच्या कामाला सुरूवात होईल. - संतोष कांबळे, नगरसेवक

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: The trees have become misery because at old Sangvi