Pune News : माळशेजघाट परिसरात ट्रेक करताना ट्रेकर मृत्युमुखी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

trekker died while trekking Malshejghat pune Gypsy trekkers Nashik

Pune News : माळशेजघाट परिसरात ट्रेक करताना ट्रेकर मृत्युमुखी

पिंपळवंडी : नाशिक येथील जिप्सी ट्रेकर्सच्या १५ ट्रेकर्सचा गृप माळशेज(ता.जुन्नर, ता.मुरबाड)परिसरात रविवारी(ता.१९)जुना माळशेज घाट व चोरदरा घाट ट्रेक करण्यासाठी आला होता. दुपारच्या सुमारास चोरदरा घाट चढत असताना शेवटच्या चढाई दरम्यान लागणाऱ्या कठीण टप्प्यावरुन जवळपास पन्नास फूट खाली पडून किरण काळे (वय५२) यांचा जागीच मृत्यू झाला.

ह्या घटनेची बातमी कळताच गिर्यारोहक व रेस्क्यू समन्वयक ओंकार ओक यांनी तातडीने नाशिक क्लाइंबर्स व रेस्क्यू असोसिएशनचे दयानंद कोळी ह्यांच्याशी तसेच जुन्नर येथील शिवनेरी ट्रेकर्सशी संपर्क साधून घटनेची माहिती कळवली. शिवनेरी ट्रेकर्सचे सदस्य निलेश खोकराळे,अनिल काशीद,अक्षय तांबे,संतोष डुकरे, निखिल कोकाटे,अल्पेश दिघे,अनिकेत डुकरे यांनी घटनास्थळी जाऊन इतर ट्रेकर्सना सुखरूप बाहेर काढले.त्यांना कमळू पोकळा,अशोक पोकळा,भास्कर रवी,रोहिदास कोरडे व इतर ग्रामस्थांनी सहकार्य केले.

नाशिकचे दयानंद कोळी,मुरबाड येथील सह्यगिरी ट्रेकर्सचे दीपक विशे व खोपोली येथील गणेश गिध हे खोल दरीत पडलेला किरण काळे यांचा मृतदेह बाहेर काढण्याचे काम करत आहेत.यावेळी मुरबाड पोलीस स्टेशनचे पोलीस उपस्थित होते.

सह्याद्रीतील दुर्घटनांचे प्रमाण वाढत असल्याने जुन्नर रेस्क्यु टीमचे संतोष डुकरे यांनी सांगितले की ट्रेकिंग व गिर्यारोहण करताना काळजी घेतली पाहिजे तसेच अवघड वाट सर करत असताना सुरक्षेची योग्य ती काळजी घेत ट्रेक केले पाहिजे.